अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यास कामगारांचे मोठे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:14 AM2021-05-01T04:14:10+5:302021-05-01T04:14:10+5:30
सातपूर : केवळ आपल्या हक्कांसाठी लढणारा वेळप्रसंगी संप, आंदोलन करणारा अशी ओळख असलेल्या कामगारांनी कोरोना महामारीच्या काळात आपली जबाबदारी ...
सातपूर : केवळ आपल्या हक्कांसाठी लढणारा वेळप्रसंगी संप, आंदोलन करणारा अशी ओळख असलेल्या कामगारांनी कोरोना महामारीच्या काळात आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडत ठप्प झालेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यास मोठी मदत केली असून, कोरोनाच्या काळात कामगारांमुळेच उद्योगक्षेत्राला ऊर्जितावस्था प्राप्त झाल्याचे उद्योजकांकडून सांगितले जात आहे. मागील वर्षी २०२० मध्ये सुरुवातीलाच कोरोना महामारीने भारतात प्रवेश केला. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशात लॉकडाऊन जाहीर केला आणि संपूर्ण भारत ठप्प झाला. उद्योगांची चाके थांबल्याने त्याची सर्वप्रथम झळ कामगारांना बसली. १० टक्के (मोठ्या उद्योगातील) कामगार सोडले तर उर्वरित ९० टक्के कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली होती तरीही कामगारवर्गाने हार मानली नाही. बहुतांश मालकवर्गाने कामगारांना सांभाळून घेतले. त्याची जाणीव ठेवून कामगारांनीही काम करून परतफेड केली. अशाप्रकारे मालक आणि कामगार यांचे दृढ नाते तयार झाले आहे.
मागील लॉकडाऊनच्या काळात अन्य क्षेत्रांतील परप्रांतीय कामगार आपल्या गावी निघून गेले होते. मात्र, उद्योगक्षेत्रातील कामगार गावी न जाता रोजीरोटीसाठी थांबून राहिले होते. त्याचा फायदा त्यांना झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वप्रथम टप्प्या-टप्प्याने उद्योग सुरू झालेत आणि कामगारांच्या हाताला काम मिळाले. काही दिवसांतच उद्योगांची चाके पूर्ण क्षमतेने फिरू लागलीत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली. संपूर्ण जगात कामगारवर्गाच्या योगदानाचा ‘सन्मान’ करण्यासाठी त्यांना सुटी दिली जाते.
इन्फो==
कोरोनाच्या काळात खऱ्या अर्थाने कामगारांनी आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडले म्हणूनच उद्योगक्षेत्र गतिमान झाले आहे. जीवावर उदार होऊन धोका पत्करून ते कामावर आल्याने त्यांचे योगदान मोठे आहे. पगारापेक्षा त्यांच्या जिवाची किंमत अनेक पटीने जास्त आहे. देशाचे अर्थचक्र रूळावर आणण्याचे काम कामगारांनी केले आहे. कामगारसुद्धा एकप्रकारचे कोरोना योध्याच आहेत. त्यांच्यासाठी टाळी आणि थाळी वाजविली पाहिजे.
- सुधीर मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, सीआयआय.
----
इन्फो===
आमच्या सभासद कामगारांची मिटिंग घेऊन उद्योग सुरू ठेवण्यासाठी त्यांच्यात सकारात्मक वातावरण तयार केले. उद्योग टिकला तर कामगार टिकेल, या भावनेने काम केले. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती येऊ द्या. मुकाबला करण्यासाठी कामगार कायम सज्ज असतो. भारतीय अर्थचक्राला कामगारांमुळेच गती प्राप्त झाली आहे.
-डॉ. डी. एल. कराड, राज्याध्यक्ष सिटू युनियन.
-----
इन्फो==
कोरोनाकाळात कामगारांनी आपली बांधीलकी जोपासून जीवावर उदार होऊन कामावर आलेत. त्यामुळे उद्योग क्षेत्राला गती मिळाली शिवाय अर्थव्यवस्था मजबूत व्हायला मदत झाली आहे. कामगारसुद्धा एक कोरोना योध्याच आहे. मागील लॉकडाऊनमध्ये कामगारवर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. यावेळी असे नुकसान होऊ नये. त्यांची रोजीरोटी शाबूत राहण्यासाठी कारखाने सुरू ठेवण्यात आले आहे.
-अरुण भालेराव, अध्यक्ष बॉश अंतर्गत कामगार संघटना.