मानवी कवट्यांद्वारे ‘बडे बाबा’चे चाले अघोरी कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:14 AM2020-12-24T04:14:34+5:302020-12-24T04:14:34+5:30
नाशिकच्या पाथर्डीमध्ये ‘बडे बाबा मच्छिंद्रनाथ ट्रस्ट’ स्थापन करत संशयित आरोपी गणेश जयराम जगताप (३७, रा. श्रद्धा व्हिला, पाथर्डी फाटा) ...
नाशिकच्या पाथर्डीमध्ये ‘बडे बाबा मच्छिंद्रनाथ ट्रस्ट’ स्थापन करत संशयित आरोपी गणेश जयराम जगताप (३७, रा. श्रद्धा व्हिला, पाथर्डी फाटा) याने ‘महामंडलेश्वर१००८’ अशी पदवी स्वत: लावून घेत स्वत:ला श्री. श्री. १००८ महंत गणेशानंदगिरी महाराज (कथित) बनवून घेतले. येथील अमरधाममधून काही लोकांना हाताशी धरून या भोंदू बाबाचे ‘खास एजंट’ रात्रीच्या अंधारात येऊन संबंधितांच्या हातांवर नोटा टेकवून बेवारस प्रेतांचे अर्धवट जळालेल्या कवट्या घेऊन पोबारा करत होते. या कवट्या महिन्यातून जसे ‘ग्राहक’ भेटतील त्याप्रमाणे पूजाविधीच्या बनावासाठी वापरल्या जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
दैवी चमत्काराद्वारे जमिनीतून मिळालेले सोने स्वत:ला वापरता येत नाही, असे सांगून बनावट सोन्याच्या विटा अन् पितळी धातूंच्या पट्ट्या भक्तांच्या हातावर देत त्यांच्याकडून हजारो-लाखोंची रोकड उकळल्याप्रकरणी इंदिरानगर, सातपूर या दोन उपनगरांमधील पोलीस ठाण्यांत संशयित गणेशानंदगिरी महाराजविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
कथित महाराजाची ट्रस्टच्या प्रयत्नातून निफाड तालुक्यातील धारणगाव-खडक येथे सप्तशक्ती देवीचे २१ कळस असलेले मंदिर उभारणी तसेच गोशाळा, माध्यमिक शाळा, भक्तनिवास यांसारखे सामाजिक कल्याणकारी उपक्रम होऊ घातल्याचा बनाव जाहिरातींच्या माध्यमातून केला गेला. याद्वारे भोळ्याभाबड्या लोकांकडून लाखो रुपये उकळले. नाशिकसह राज्यभरातील मोठ्या शहरांमध्ये या भोंदूबाबाने अनेक मोठे मासे आपल्या गळाला लावले आहेत. हा भोंदूबाबा भोळ्याभाबड्या जनतेची आर्थिक लूट करून ‘माया’ जमवत होता. पाथर्डी येथे त्याने ट्रस्टचे मुख्य कार्यालय म्हणून स्वत:च्या निवासस्थानालाच त्याने ‘आश्रम’चे स्वरूप दिले आहे.
---इन्फो--
लोटांगण घालणारे ‘ते’ कलाकार मोकाटच
बाबा जेथे जात तेथे अगोदरपासून उपस्थित राहून या भोंदू गणेशानंदगिरी महाराजांच्या पायांवर लोटांगण घालत वातावरणनिर्मिती करणाऱ्या पडद्यामागील बहुतांशी कलाकार अद्यापही मोकाटच फिरत आहे. यामध्ये बाबाला मानवी कवट्या पुरविणाऱ्यांपासून तर स्वत:च्या मळ्यात आघोरी कृत्यासाठी जागा देण्यापर्यंत आणि ‘ताळेबंद’ सांभाळणाऱ्या महिलाही अजून पोलिसांच्या हाती आलेल्या नाहीत.
--इन्फो--
‘महामंडलेश्वर१००८’ पदवी मिळाली तरी कोठून?
विविध धार्मिक यात्रांमध्ये पूजाविधीचे देखावे करणे, जमलेल्या भक्तांवर आसूड ओढणे आणि भक्तीचा आव आणत भोंदूगिरीचे कृत्य चालविणारा हा स्वयंघोषित कथित महामंडलेश्वर गणेशानंदगिरी महाराज सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडी भोगत आहे. लवकरच त्याचा ताबा सातपूर पोलिसांकडून घेतला जाणार आहे.
---
फोटो आर वर २०बाबा१ / २०बाबा ३