नूतन वर्षाच्या पहिल्याच महिन्याने दिला मोठा दिलासा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:23 AM2021-02-06T04:23:38+5:302021-02-06T04:23:38+5:30
नाशिक : कोरोनाचा बहर दिवाळीपासून कमी होण्यास प्रारंभ झाल्यानंतर महिन्यागणिक कोरोनाचा आलेख घसरत चालल्याचे दिलासादायक चित्र आहे. डिसेंबर महिन्याच्या ...
नाशिक : कोरोनाचा बहर दिवाळीपासून कमी होण्यास प्रारंभ झाल्यानंतर महिन्यागणिक कोरोनाचा आलेख घसरत चालल्याचे दिलासादायक चित्र आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत नवीन वर्षाच्या पहिल्याच महिनाअखेरीस कोरोना रुग्णांचे प्रमाण जवळपास निम्म्यावर आले आहे. कोरोना संशयितांच्या चाचणीत बाधित आढळणाऱ्यांचे प्रमाणदेखील शंभरमागे ३० वरून शंभरमागे ८ वर आले आहे.
कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येत सर्वाधिक वाढ ही सप्टेंबर महिन्यात ३८ हजार ४९० इतकी नोंदवली गेली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात थेट निम्म्यावर आलेली रुग्णसंख्या १७,७९५ वर पोहोचली आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात पुन्हा निम्म्याने घट येऊन ही संख्या ७,४६६ वर आली होती; मात्र दिवाळीच्या काळातील गर्दीमुळे रुग्णसंख्येतही थोडीशी वाढ नोंदवली गेली. त्यामुळे डिसेंबर महिन्यात त्यात अल्पशी वाढ होऊन ती संख्या ८९८२ वर पोहोचली होती; मात्र जानेवारी महिन्यात ती संख्या पुन्हा तीन हजारांनी घटून ५६४५ वर येऊन ठेपली आहे. जिल्ह्यातील १ लाख १२ हजार ९८१ कोरोना बाधितांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्य:स्थितीत १ हजार २०४ रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत २ हजार ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख १६ हजार २३९ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२० टक्के असून, त्यातदेखील सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे.
इन्फो
गत महिन्यापासून बाधितांची संख्या शंभर ते दीडशेच्या दरम्यान राहू लागली असून, साधारण तेवढेच रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतत आहेत, तसेच मृतांची संख्यादेखील जानेवारी महिन्याच्या प्रारंभापासून एका आकड्यावर आली असून, अखेरच्या टप्प्यात तर सातत्याने दोन-तीन किंवा त्यापेक्षा कमीच रहात आहे. या सर्व बाबी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागासह नागरिकांसाठीदेखील दिलासादायक ठरू लागल्या आहेत.
इन्फो
मृत्युसंख्या मेनंतर प्रथमच दुहेरी आकड्यात
डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात ८९८२ रुग्ण बाधित होते, जानेवारी महिन्यात हीच संख्या ५६४५ वर आली आहे. बाधितसंख्येचा दर १६.१९ वर पोहोचला असून, जानेवारीत हा रेशिओ ९.०५ वर आला आहे. तर डिसेंबर महिन्यात १७७ वर पोहोचलेला मृतांचा आकडा जानेवारीत ८३ वर आला आहे, तसेच डिसेंबर महिन्यात १.९७ वर असलेला डेथरेट आता १.४७ वर आलेला आहे.
इन्फो
महिना बाधित मृत्यू
एप्रिल २८० १२
मे ९२२ ६०
जून २९११ १६६
जुलै १०३०२ २६१
ऑगस्ट २२९७० ३७३
सप्टेंबर ३८४९० ४९८
ऑक्टोबर १७७९५ ३००
नोव्हेंबर ७४६६ १२१
डिसेंबर ८९८२ १७७
जानेवारी ५६४५ ८३
-------------------------
या बातमीसाठी ग्राफ करण्यासाठी सपकाळे यांच्याकडे पाठवला आहे. तसेच कोरोनाचा सिम्बाॅलिक फोटोदेखील वापरता येईल.