प्रवेशोत्सवाने गजबजल्या शाळा
By admin | Published: June 16, 2017 12:21 AM2017-06-16T00:21:03+5:302017-06-16T00:21:24+5:30
शाळेची पहिली घंटा : वाजत-गाजत मिरवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात नव्या शैक्षणिक वर्षाला गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त गावोगावी विद्यार्थी व शिक्षकांनी प्रभातफेऱ्या काढल्या. नवागतांच्या स्वागताची प्रत्येक शाळेत जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यांचे औक्षण करण्यासह गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांना मिठाई म्हणून चॉकलेट व लाडू वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानांतर्गत पाठ्य-पुस्तकांचे वितरण करण्यात आले. दापूर येथे जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्यासह विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली.
पेठ : तालुक्यातील जवळपास २२० प्राथमिक, माध्यमिक व शासकीय आश्रमशाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांनी शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
सकाळपासूनच तालुक्याच्या दऱ्याखोऱ्यात चिमुकल्यांनी शाळेच्या आवारात हजेरी लावली होती. पारंपरिक पद्धतीने नव्याने दाखल होणाऱ्या मुलांची मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारावर गुलाबपुष्प देऊन बालकांचे जंगी स्वागत करण्यात आले. आंब्याच्या पानांचे तोरण, झेंडूच्या फुलांनी सजवलेले वर्ग व सडा रांगोळ्यांनी सजवलेला शाळेचा परिसर नवागतांना आकर्षित करून घेत होता.
सर्वशिक्षा अभियान अंतर्गत पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके हातात पडल्याने मुलांना अधिक आनंद झाल्याचे दिसून येत होते. जिल्हा परिषद शाळा, करंजाळी व कोहोर येथे सभापती पुष्पा गवळी यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सजवलेल्या ट्रॅक्टरमधून मुलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
याप्रसंगी सदस्य पुष्पा पवार, नंदू गवळी, गटविकास अधिकारी भालचंद्र बहिरम, गटशिक्षणाधिकारी
कैलास माळवाळ, विस्तार
अधिकारी वसंत खैरनार, केंद्रप्रमुख लता आढाव, वाल्मीक सावळे उपस्थित होते.