ग्रीन जिम दुरुस्तीची जबाबदारी सोपवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:27 AM2019-07-27T00:27:31+5:302019-07-27T00:27:58+5:30
सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील उद्यानांमध्ये ग्रीन जिम व खेळणी बसविण्यात येणार आहेत. त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपविण्यातबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी सातपूर प्रभाग सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.
सातपूर : सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील उद्यानांमध्ये ग्रीन जिम व खेळणी बसविण्यात येणार आहेत. त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपविण्यातबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी सातपूर प्रभाग सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.
प्रभाग सभापती संतोष गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सातपूर प्रभाग सभा घेण्यात आली. सातपूर विभागातील जवळपास सर्वच प्रभागांमधील उद्यानात लाखो रु पयांची खेळणी बसविण्यासाठीचे प्राकलने प्रशासकीय मंजुरीसाठी सभागृहात ठेवण्यात आली होती. खेळणी बसविण्याच्या कामांना मंजुरी देताना मनसे गटनेते सलीम शेख यांनी खेळणी बसविल्यानंतर त्यांची देखभालीची जबाबदारीदेखील निश्चित करण्यात यावी, तसा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली. त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनीदेखील दुजोरा दिला. सातपूर तरणतलाव सुरू करण्यात यावा, गलिच्छवस्ती सुधार योजनेतील राखीव निधीतून स्लम भागातील समस्या सोडविण्यात याव्यात, अशीही मागणी शेख यांनी केली. सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे तुटलेले असून, त्यांची त्वरित दुरु स्ती करण्यात यावी, अशी मागणी नयना गांगुर्डे यांनी केली. मोकाट जनावरे आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी योगेश शेवरे यांनी केली. प्रत्येक काम आणि समस्या सांगितल्यानंतरच अधिकारी कामे करतात, असे दिलीप दातीर म्हणाले, तर अधिकारी कामे करीत नाहीत. नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते, अशी खंत रवींद्र धिवरे यांनी व्यक्त केली. यावेळी दीक्षा लोंढे, इंदूबाई नागरे, भागवत आरोटे, विजय भंदुरे, दशरथ लोखंडे यांनीही विविध मागण्या केल्या. यावेळी नगरसेवक डॉ. वर्षा भालेराव, हेमलता कांडेकर, माधुरी बोलकर यांच्यासह विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी, संजय पाटील, श्याम वाईकर, माधुरी तांबे, डॉ. रुचिता पावसकर, डॉ. प्रमोद सोनवणे, एस. एल. अग्रवाल, सलीम शेख, वृषाली रोडे, प्रदीप परदेशी आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.
नवनियुक्त अशासकीय सदस्य विजय भंदुरे व दशरथ लोखंडे यांनी प्रभाग सभेत नियुक्तिपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी बिनविरोध निवड झालेल्या हेमलता कांडेकर यांचाही सभागृहाच्या वतीने प्रभाग सभापती संतोष गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तर प्रभाग क्रमांक १० मधून बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका इंदूबाई नागरे यांचेही सभागृहात स्वागत करण्यात आले. नाशिक भूषण पुरस्कार मिळालेल्या नगरसेविका डॉ. वर्षा भालेराव यांचाही सत्कार करण्यात आला.
४सातपूर विभागातील विविध उद्यानांमध्ये सुमारे ६५ लाख रुपयांची खेळणी व ग्रीन जीम बसविण्यात येणार आहे, तर याच उद्यानांमध्ये सुमारे १५ लाख रु पये खर्चून स्टेडियममध्ये बँचेस बसविण्यात येणार आहे.