सायनेत मेगा टेक्सटाइल पार्कला हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:32 AM2018-09-14T01:32:50+5:302018-09-14T01:33:02+5:30
मालेगाव शहरालगतच्या सायने बु।। औद्योगिक वसाहतीत मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्यास राज्य वस्रोद्योग विभागाने हिरवा कंदील दिला असून, येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे.
मालेगाव : मालेगाव शहरालगतच्या सायने बु।। औद्योगिक वसाहतीत मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्यास राज्य वस्रोद्योग विभागाने हिरवा कंदील दिला असून, येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे.
राज्यातील भिवंडी, सोलापूर, खामगाव व मालेगाव येथे मेगा टेक्सटाइल क्लस्टर पार्क उभारण्याच्या दिशेने हालचाली गतिमान झाल्या होत्या. यादृष्टीने शहरातील मालेगाव इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने सायने बुद्रुक येथे मेगा क्लस्टर पार्क उभारण्यात यावे या मागणीचे पत्र १६ जुलै रोजी वस्रोद्योगचे मुंबई प्रादेशिक आयुक्त नरेश कुमार यांना दिले होते. याची दखल घेत राज्याच्या वस्रोद्योग संचालक माधवी खोडे-चावरे यांनी ८ आॅगस्ट रोजी सायने वसाहत येथील जागेची पाहणी केली. सायने औद्योगिक वसाहत येथे आवश्यक जमीन उपलब्ध असून, जागा संपादनासाठी रक्कम अदा करावी लागणार नसल्याने जागेचा तिढा सुटला. राज्याचे वस्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या दालनात १० रोजी अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मालेगाव (सायने बु।।), भिवंडी व चिखली येथे मेगा टेक्सटाइल क्लस्टर पार्क उभारण्यास मंजुरी दिली असून, सर्वप्रथम मालेगाव येथे प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याची माहिती अलीम फैजी यांनी दिली.