स्मार्ट सिटीच्या कामांना हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:28 PM2020-04-29T22:28:21+5:302020-04-29T23:33:28+5:30

नाशिक : लॉकडाउनमुळे रखडलेली स्मार्ट सिटी कंपनीची साडेतीनशे कोटी रुपयांची कामे सुरू करण्यास आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हिरवा कंदील दिला आहे.

 Green lanterns for smart city works | स्मार्ट सिटीच्या कामांना हिरवा कंदील

स्मार्ट सिटीच्या कामांना हिरवा कंदील

Next

नाशिक : लॉकडाउनमुळे रखडलेली स्मार्ट सिटी कंपनीची साडेतीनशे कोटी रुपयांची कामे सुरू करण्यास आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हिरवा कंदील दिला आहे. अर्थात, ही कामे करताना फिजिकल डिस्टन्सिंग आणि अन्य प्रकारच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्याच्या अटीदेखील आयुक्तांनी घातल्या आहेत. त्यामुळे आता गावठाण भागातील कामे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्मार्ट सिटीच्या अंतर्गत गावठाण भागात २४१ कोटी रुपयांची विकासकामे करण्यात येणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून हा विषय गाजत होता. यापूर्वी गावठाण भागात रस्ते, पाणी आणि मलवाहिका ही कामे करण्यासाठी एकत्रित निविदा मागवल्यानंतर साठ टक्के ज्यादा दराची निविदा आली होती. त्यामुळे हा विषय गाजला होता. अनेक संचालक आणि नगरसेवकांनी शंका उपस्थित केल्यानंतर सर्व कामे वेगळी करण्यात आली आहेत. यानुसार निविदा मागवून मंजुरीच्या प्रक्रियेनंतर रस्ता आणि मलवाहिका टाकण्याची महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली होती. त्यात चांगले रस्ते फोडण्यास झालेला विरोध वगळता अन्य कामे सुरळीत सुरू झाली होती. तर दुसरीकडे प्रोजेक्ट गोदा अंतर्गत ११० कोटी रुपयांची पहिल्या टप्प्यातील कामेदेखील सुरू झाली होती. यात रामवाडी ते होळकर पूल हा पहिला टप्पा, होळकर पूल ते गाडगे महाराज पूल हा दुसरा टप्पा तर गाडगे महाराज पुलापासून टाळकुटे पुलापर्यंतचा तिसरा टप्पा अशाप्रकारचे नियोजन आहे.
गोदावरी रिव्हर फ्रंट आणि होळकर पुलाखाली मेकॅनिकल गेट बसविण्याचे कामदेखील मंजूर आहे. ही सर्व कामे सुरू होत असताना गेल्या महिन्यात २३ मार्चपासून आत्तापर्यंत लॉकडाउनच असल्याने सर्वच कामे रखडली होती. आता २० एप्रिलनंतर अनेक उद्योग सुरू होत असतानाच शासकीय कामे करण्याबाबतच शिथिलता देण्यात आली आहे. महापालिकेने पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण विभागाची सुमारे शंभर कोटी रुपयांच्या खर्चाची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांबाबतदेखील आशा पल्लवित झाल्या होत्या.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी यांसदर्भात आयुक्तांना प्रस्ताव दिल्यानंतर त्यांनी तो मंजूर केला आहे. मजुरांसाठी तहसीलदारांकडून परवाना मिळवणे, कमीत कमी मजुरांमध्ये कामे करणे तसेच फिजिकल डिस्टन्सिंग आणि कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अत्यावश्यक नियमांचे पालन करावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

Web Title:  Green lanterns for smart city works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक