हिरवा वाटाणा १० तर गाजर १५ रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:12 AM2020-12-26T04:12:17+5:302020-12-26T04:12:17+5:30
नाशिक व राज्यातील अन्य सर्व बाजारपेठेत स्थानिक शेतमाल सुरू झाल्याने बाजार घसरले आहे. हिवाळ्याच्या कालावधीत वाटाणा तसेच गाजराला ग्राहकांकडून ...
नाशिक व राज्यातील अन्य सर्व बाजारपेठेत स्थानिक शेतमाल सुरू झाल्याने बाजार घसरले आहे. हिवाळ्याच्या कालावधीत वाटाणा तसेच गाजराला ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याने नोव्हेंबर महिन्यात दरवर्षी बाजारभावात घसरण होत असल्याचे नाशिक कृषी बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ग्राहकांना किरकोळ बाजारात वाटाणा ४० रुपये तर गाजर ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. नाशिक बाजार समितीतून मुंबई शहर व उपनगरात दैनंदिन मोठ्या प्रमाणात भाजीपाला माल निर्यात केला जातो; मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईत भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. मुंबईत मध्यप्रदेश तसेच गुजरात राज्यातील शेतमाल मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागल्याने आणि त्यातच हिरवा वाटाणा व गाजर आवक वाढल्याने बाजारभाव घसरले आहेत.
वर्षभरात नोव्हेंबरपासून वाटाणा बाजारात विक्रीसाठी येतो. नागरिक दररोज भाजीपाला खातात; मात्र वाटाणा वर्षभरातून एकदा येणारे पीक असल्याने व अन्य पालेभाज्यांपेक्षा हंगामात स्वस्त मिळत असल्याने ग्राहक वाटाणा आणि गाजराला पसंती देतात, त्यामुळे सर्वच फळभाज्यांचे बाजारभाव नोव्हेंबर, तसेच डिसेंबर महिन्यात कोसळतात. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्यप्रदेश, इंदूर आणि ग्वाल्हेर या भागातून सध्या मोठ्या प्रमाणात हिरवा वाटाणा विक्रीसाठी दाखल होत आहे. बाजार समितीत वाटाणा मालाची २५० क्विंटल तर गाजराची १५० क्विंटलपर्यंत दैनंदिन आवक होत आहे. यावर्षी भरपूर पाऊस झाल्याने गाजर व वाटाणा उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने आवक वाढली आहे.