हरित क्रांती...

By किरण अग्रवाल | Published: July 29, 2018 01:10 AM2018-07-29T01:10:53+5:302018-07-29T01:16:00+5:30

सरकारी उपक्रमांच्या उद्दिष्टपूर्तीकडे नेहमीच संशयाने बघितले जाते, कारण यंत्रणांच्या आकडेमोडीत फसवा-फसवीच अधिक असल्याचा अनेकदा अनुभव येतो. परंतु ज्या उपक्रमात लोकसहभाग मिळवण्यात यश येते, त्यात तशी वा तेवढी शंका न राहता बऱ्यापैकी उद्दिष्टपूर्ती साधणे शक्य होते. हरित महाराष्ट साकारण्यासंदर्भातही तेच घडून येताना दिसत आहे. यातील आकडेवारीच्या पडताळणीत न पडताही सदर उपक्रमाचे यश दिसून येणारे आहे.

 Green Revolution ... | हरित क्रांती...

हरित क्रांती...

googlenewsNext
ठळक मुद्देयंत्रणांच्या आकडेमोडीत फसवा-फसवीच अधिक वृक्षलागवड मोहिमेला सर्वत्रच उत्स्फूर्त प्रतिसाद टॅँकरद्वारे पाणी घालून वृक्ष जगविण्याची, वाढविण्याची संबंधितांची धडपड

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात १३ कोटी वृक्षलागवड करून हरित महाराष्ट साकारण्याचा संकल्प सोडला होता. त्यानुसार राज्यभर मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे, ही मोहीम केवळ सरकारी पातळीवर किंवा वनविभागापुरती मर्यादित न राहता लोकांचा सहभाग त्यात मिळवण्यात यंत्रणांना यश आले. पर्यावरण रक्षणाबाबतची एकूणच जाणीवजागृती पाहता वृक्षलागवड मोहिमेला सर्वत्रच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसतो आहे. ठिकठिकाणच्या सामाजिक संस्थाच नव्हे तर, शाळा-शाळांमधील विद्यार्थीही या मोहिमेत हिरिरीने सहभागी होत आहेत. त्यामुळेच जुलै महिना संपायला आठवडा शिल्लक असताना राज्यात सुमारे १२ कोटी वृक्षलागवड झाल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. हा वेग अगर प्रतिसाद पाहता जुलैअखेर उद्दिष्टापेक्षाही अधिकच आकडा गाठला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यात नांदेड जिल्हा आघाडीवर असून, नाशिक दुसºयास्थानी आहे. नाशिक जिल्ह्यात ६७ लाख १७ हजार रोपे लावली गेल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. यातील आकडेवारी अचाट असली तरी, शासकीय यंत्रणांखेरीज विविध संस्थांतर्फे तसेच उद्योग समूहांतर्फे यासाठी चालविले जात असलेले प्रयत्न मात्र नक्कीच नजरेत भरणारे आहेत. जनसामान्यांमध्ये यासंदर्भात जागलेली सजगता यातून अधोरेखित होणारी असून, तीच महत्त्वाची तसेच आश्वासक दिलासा देणारी आहे. ‘लोकमत’ माध्यम समूहानेही यात खारीचा वाटा उचलत चालू शैक्षणिक वर्षात शाळांच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये रोपे वाटप केलीत. विविध मोहिमांतर्गत ही वृक्षलागवड होत आहेच; परंतु काही उद्योग समूहांनीही त्याकरिता पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे केवळ लागवडीपुरता ही मोहीम न उरता पाऊस नसल्यास टॅँकरद्वारे पाणी घालून वृक्ष जगविण्याची, वाढविण्याची संबंधितांची धडपड कौतुकास्पद ठरली आहे. अर्थात, शासकीय जागांवर वृक्षारोपण करताना उद्योगसमूहांना विविध निकषांच्या अडथळ्यांचा सामना करावा लागत असण्याच्या तक्रारी आहेत; पण सामाजिक जबाबदारीचे भान बाळगणारे समूह त्या दिव्यालाही सामोरे जात नेटाने आपले काम करीत आहेत. वनमंत्री मुनगंटीवार यांच्या ध्येयपूर्तीला असे असंख्य हात लागलेले आहेत. यातून नव्याने हरित क्रांती घडवून आणणारी मोठी चळवळच उभी राहिल्याचे समाधान त्यातील आकडेवारीपेक्षा कितीतरी मोठे मानता यावे, असेच आहे.

Web Title:  Green Revolution ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.