महाराजा अग्रसेन यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:13 AM2017-09-22T01:13:32+5:302017-09-22T01:13:41+5:30
समाजवाद व अहिंसावादाचे आद्यप्रवर्तक महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे अग्रवाल समाजाकडून सेवा व परोपकाराचे कार्य सुरू असल्याचे गौरवोद्गार याप्रसंगी महापौर रंजना भानसी यांनी काढले.
नाशिक : समाजवाद व अहिंसावादाचे आद्यप्रवर्तक महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे अग्रवाल समाजाकडून सेवा व परोपकाराचे कार्य सुरू असल्याचे गौरवोद्गार याप्रसंगी महापौर रंजना भानसी यांनी काढले.
अग्रवाल सभेतर्फे आयोजित श्री अग्रसेन जयंती सप्ताहात अग्रएकता रॅली, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच शेअर स्ट्रिट यांसारखे कार्यक्रम घेण्यात आले. या सप्ताहाचा समारोप ठिकठिकाणी प्रतिमापूजन व गुणगौरव कार्यक्रमाने झाला. याअंतर्गत आडगाव येथील बाला सुंदरी माता मंदिरात प्रतिमापूजन करण्यात आले. रविवार कारंजा येथे महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा आदि मान्यवरांच्या हस्ते, तर महात्मानगर येथे आमदार सीमा हिरे, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे आदींच्या हस्ते महाराजा अग्रसेन यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. महिला मंडळातर्फे गुरुवारी (दि.२१) दुपारी सावरकरनगर ते नक्षत्र लॉन्सपर्यंत कलश यात्राही काढण्यात आली. यानंतर झालेल्या मुख्य जयंती समारंभात सभेतर्फे व अग्रसेन विश्वस्त ट्रस्टतर्फे विविध विद्या शाखातील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अमरावती येथील उद्योगपती चंद्रप्रकाश जाजोदिया व मालेगाव येथील महेश पाटोदिया यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी अग्रवाल सभेचे अध्यक्ष नेमीचंद पोद्दार यांनी प्रास्ताविक केले. जयंती संयोजक सुशील केडिया, डॉ. बाबुलाल अग्रवाल आदींनी पाहुण्याचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर सभेचे कार्याध्यक्ष आर्कि.सुरेश गुप्ता, विभागीय अध्यक्ष ताराचंद गुप्ता, वरिष्ठ उपाध्यक्ष भगवानदास अग्रवाल, दिनेश अग्रवाल, श्याम ढेडिया, महिला पदाधिकारी प्रेमा हिसारिया, सपना अग्रवाल, विनिता पोद्दार अंकित अग्रवाल आदि पदाधिकारी उपस्थित होते. महामंत्री विमल सराफ यांनी आभार प्रदर्शन केले.