हजारो आंबेडकरी अनुयायांचे पोस्टकार्डद्वारे अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:14 AM2020-12-06T04:14:09+5:302020-12-06T04:14:09+5:30
देवगाव : कोरोनामुळे ६ डिसेंबरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी दादर येथील समस्त आंबेडकरी जनतेची ऊर्जाभूमी असलेल्या चैत्यभूमी ...
देवगाव : कोरोनामुळे ६ डिसेंबरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी दादर येथील समस्त आंबेडकरी जनतेची ऊर्जाभूमी असलेल्या चैत्यभूमी येथे न जाता महामानवास ऑनलाइन घरातूनच अभिवादन करण्याचे आंबेडकरी अनुयायांनी ठरवले आहे. कोरोना महामारीमुळे संसर्ग टाळण्यासाठी सोशल मीडियावर आंबेडकरी अनुयायांनी समस्त आंबेडकरी जनतेला राष्ट्रनिर्मात्यास घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनुयायी ऑनलाइन तसेच संविधानाची प्रतिकृती, कविता, बाबासाहेबांचे विचार पोस्ट कार्डवर लिहून ते चैत्यभूमी येथे पाठवून अनोख्या पद्धतीने अभिवादन करत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी दादर येथील ऊर्जाभूमी असलेल्या चैत्यभूमी येथे येतात. अगदी वादळ-वारा, पाऊस, थंडी अशी कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तरी लहानथोर, आबालवृद्ध, महिला ‘जय भीम’चा घोष करत चैत्यभूमी येथे येतात. मात्र, मागील आठ ते नऊ महिने देशासह जगावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनामुळे असंख्य नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. या रोगावर अद्याप तरी कुठलीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे यावर्षी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायी यावेळी चैत्यभूमीवर कुठल्याही प्रकारची गर्दी न करता महामानवास ऑनलाइन पद्धतीने, पोस्ट कार्ड पाठवून घरातूनच अभिवादन करणार आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकरी जनतेला आवाहन करून भीम जयंती ऑनलाइन पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचे तंतोतंत पालन करून कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेऊन आंबेडकरी अनुयायांनी भीम जयंती यशस्वीपणे पार पाडली होती. त्याच पद्धतीने महापरिनिर्वाणदिनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आंबेडकरी अनुयायांनी चैत्यभूमीस गर्दी न करता ऑनलाइन पद्धतीने, पोस्ट कार्डच्या माध्यमातून, घरातूनच अभिवादन करण्याचे ठरवले आहे.
------------------------------------------------------------
कल्पप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी जीवनाला अनन्यसाधारण महत्त्व दिले असून, मानवाचे आयुष्य सुखी करणे हाच त्यांच्या महान कार्याचा आलेख आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमीवर जाऊन गर्दी न करता नियमांचे पालन करून घरातूनच ऑनलाइन स्वरूपात भीमगीते, जलसे, जीवनपट, कविता, प्रबोधन तसेच पोस्ट कार्ड पाठवून समस्त आंबेडकरवादी, मानवतावादी नागरिकांनी अभिवादन करायचे आहे.
- तुषार दोंदे, कवी, देवगाव.
-----------------------------------------------------------
फोटो - ०५ आंबेडकर लेटर
आंबेडकरी अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादनपर पाठवलेली पोस्ट कार्ड.
===Photopath===
051220\05nsk_21_05122020_13.jpg
===Caption===
आंबेडकरी अनुयायांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादनपर पाठवलेली पोस्ट कार्ड.