मानवतेचा वसा जपलेल्यांना सलाम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 02:05 AM2022-03-11T02:05:25+5:302022-03-11T02:05:54+5:30
मानवतेचे गान गाणाऱ्या कुसुमाग्रजांपासून प्रत्येक थोरामोठ्याने इतरांसाठी जगणे हेच खरे जीवन असल्याचे भान आपल्याला दिले आहे. कोरोना काळात एकीकडे सख्ख्या नात्यात अंतर पडल्याचे दिसत असतानाच अनेक लोक जीवावर उदार होऊन दुसऱ्यांसाठी झटत असल्याचे पहायला मिळाले. कोरोना काळात असा मानवतेचा वसा घेऊन कार्यरत राहिलेल्या प्रत्येकाला सलाम करुन हा सन्मान त्या सर्वांना अर्पण करीत असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सोहळ्यात टोपे यांच्यासह पं. सुरेश तळवलकर, डॉ. हेमचंद्र प्रधान, डॉ. सुधीर पटवर्धन, अतुल पेठे आणि सीताबाई घारे यांना गोदावरी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नाशिक : मानवतेचे गान गाणाऱ्या कुसुमाग्रजांपासून प्रत्येक थोरामोठ्याने इतरांसाठी जगणे हेच खरे जीवन असल्याचे भान आपल्याला दिले आहे. कोरोना काळात एकीकडे सख्ख्या नात्यात अंतर पडल्याचे दिसत असतानाच अनेक लोक जीवावर उदार होऊन दुसऱ्यांसाठी झटत असल्याचे पहायला मिळाले. कोरोना काळात असा मानवतेचा वसा घेऊन कार्यरत राहिलेल्या प्रत्येकाला सलाम करुन हा सन्मान त्या सर्वांना अर्पण करीत असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सोहळ्यात टोपे यांच्यासह पं. सुरेश तळवलकर, डॉ. हेमचंद्र प्रधान, डॉ. सुधीर पटवर्धन, अतुल पेठे आणि सीताबाई घारे यांना गोदावरी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
येथील रावसाहेब थोरात सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी टोपे यांनी हा पुरस्कार यापूर्वी खूप मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आला असल्याने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आल्याचे सांगितले. आपण प्रत्येक जण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून कार्यरत रहायला हवे. कोरोना काळात मालेगाव, धारावीसारख्या भागात जाऊन तसेच प्रत्येक आरोग्यकर्मींना प्रेरित करताना हीच भावना त्यांच्यात वाढवण्याचे प्रयत्न केल्याचेही टोपे यांनी नमूद केले. लेखक संशोधक डॉ. हेमचंद्र प्रधान यांनी विज्ञान ही एक विचारपद्धती असल्याची भावना समाजात रुजणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच विज्ञान निर्मितीची मूळ प्रेरणा ही जिज्ञासाच असते. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे बालकांपर्यंत आपल्याच मातृभाषेतून पोहोचल्यास त्यांना ते झटकन उमगते. त्यामुळे ज्ञान मराठीतून पाेहोचविण्यासाठी सजगतेने प्रयास करणार असल्याचेही डॉ. प्रधान यांनी नमूद केले. ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी नाशिकमध्ये १९९० च्या दशकात नोकरीसाठी आलो असतानाच्या काळातील प्रयोग परिवाराच्या माध्यमातून केलेल्या कार्याच्या आठवणी सांगितल्या. प्रत्येक कलेने मन आणि बुद्धी सुसंस्कृत आणि सृजनशील होते. ही सृजनशीलता मरु नये, यासाठी प्रयास आवश्यक असल्याचेही पेठे यांनी नमूद केले. चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन यांनी अन्य कलांइतका प्रेक्षक अद्यापही चित्रकलेला लाभला नसल्याचे सांगितले. जोपर्यंत चित्रकलेचा प्रेक्षक वाढत नाही आणि कला सर्वदूर पोहोचत नाही, तोपर्यंत उद्दिष्टपूर्ती होणार नसल्याचेही पटवर्धन यांनी नमूद केले.