विद्रोही साहित्य संमेलानाचे ग्रेटा थनबर्गला निमंत्रण, ग्रेटा महाराष्ट्रात येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 01:20 AM2021-02-08T01:20:51+5:302021-02-08T14:21:21+5:30
greta thunberg : दिल्ली पोलिसांनी भावना भडकावल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या तसेच सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास सोशल मीडियावरुन पाठिंबा देणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गला नाशिक शहरात होऊ घातलेल्या १६ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी आमंत्रण देण्याचा निर्धार आयोजकांनी नियोजन बैठकीत केला आहे.
दिल्ली पोलिसांनी भावना भडकावल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या तसेच सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास सोशल मीडियावरुन पाठिंबा देणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गला नाशिक शहरात होऊ घातलेल्या १६ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी आमंत्रण देण्याचा निर्धार आयोजकांनी नियोजन बैठकीत केला आहे. (Greta Thunberg to be invited for Vidrohi Sahitya Sammelan)
हुतात्मा स्मारकात रविवारी (दि.७) विद्रोही साहित्य संमेलनाच्या नियोजन बैठकीत ग्रेटा थनबर्ग यांना उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण देऊन त्यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच संमेलनाच्या नियोजित समित्यांविषयीही चर्चा करण्यात आली असून रविवारी (दि.१४) विद्रोही साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
यावेळी प्रा. प्रतिमा परदेशी, गणेश उन्हवणे, किशोर ढमाले, राजू देसले, नितीन रोठे, मन्साराम पवार, प्रभाकर धात्रक, चंद्रकांत भालेराव, व्ही. टी. जाधव, सुभाष काकुस्ते आदींनी संमेलनाच्या नियोजन आणि भूमिकेबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केले. दरम्यान, विविध समित्या, ठरावांबाबत चर्चा करण्यासोबतच एक मूठ धान्य, एक रुपया संकल्पनेवर आधारीत निधी संकलनाचे नियोजन करण्यात आले.
तसेच दि. २० मार्च ते २५ मार्च या कालावधीत बाबुराव बागूल यांच्या स्मृतीदिनानिमित्त सप्ताह व विहित गावातील त्यांच्या निवासस्थानापासून मशाल ज्योत काढून संमेलनाचे दीपप्रज्वलन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. बैठकीस अश्पाक कुरेशी, सदाशिव गनगे, अर्जुन बागुल, विजया दुर्धवळे, राजेंद्र जाधव, नीलेश सोनवणे, रवींद्र पगारे, ताराचंद मोतमल, दीपाली वाघ आदी उपस्थित होते.