हिमालयाचा प्रहरी गमावल्याची खंत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:15 AM2021-05-22T04:15:13+5:302021-05-22T04:15:13+5:30
नाशिक : ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने देशवासीयांनी जणू हिमालयाचा ‘प्रहरी’ अर्थात रक्षक गमावला असल्याची खंत नाशिकच्या जुन्या ...
नाशिक : ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने देशवासीयांनी जणू हिमालयाचा ‘प्रहरी’ अर्थात रक्षक गमावला असल्याची खंत नाशिकच्या जुन्या जाणत्या पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली. नाशिकला दोन कार्यक्रमांच्या निमित्ताने ते येऊन गेल्याने त्यांच्या भाषणातील विचारांनीदेखील नाशिककरांना मंत्रमुग्ध केले होते.
बहुगुणा यांच्या चिपको आंदोलनाने ऐंशीच्या दशकात संपूर्ण देशातील पर्यावरणवाद्यांना बळ मिळाले होते. पर्यावरणाचे आंदोलन योग्य कारणासाठी असेल आणि तेदेखील आक्रमकतेने केले तर केंद्र आणि राज्यांचे शासनदेखील झुकू शकते, हे त्यांच्या आंदोलनांनी दाखवून दिले होते. स्वत:ला हिमालयाचा प्रहरी म्हणवून घेण्यात त्यांना खूप आनंद वाटत असे. नाशिकमध्ये कैलास मठात त्यांना १९९८ साली सरस्वती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. तसेच त्यानंतर २००४ या वर्षीदेखील त्यांचे नाशिकला एका कार्यक्रमानिमित्ताने आगमन झाल्याने त्यांचे विचार ऐकण्याची संधीदेखील नाशिककरांना लाभली होती.
कैलास मठातील सरस्वती पुरस्कार प्रदान करण्याच्या निमित्ताने माझा त्यांच्याशी प्रथम संबंध आला. त्यानंतर दर तीन-चार वर्षांनी ते नाशिकला आले किंवा मी हिमालयात गेलो की त्यांची भेट व्हायची. या धरतीशी आणि हिमालयाशी नातं असलेले ते एक महान व्यक्तिमत्त्व होते. आपल्या तत्त्वांशी अत्यंत प्रामाणिक असलेला मोठा सामाजिक कार्यकर्ता आणि मार्गदर्शक गमावल्याचे दु;ख आहे.
स्वामी संविदानंद सरस्वती, कैलास मठ
नाशिकला कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना त्यांची भेट झाली होती. आपला समाज उपभोगवादापासून दूर गेला नाही, तर निसर्गाचा विनाश अटळ असल्याचे त्यांचे शब्द अजूनही स्मरणात आहेत. प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या गरजा कमीत कमी करायला हव्यात, हा त्यांचा विचार आजही अनुकरणीय आहे. पर्यावरणासाठी झटणारा अत्यंत मोठा सामाजिक कार्यकर्ता गमावल्याचे दु:ख असून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
दिगंबर गाडगीळ , ज्येष्ठ पक्षिमित्र, पर्यावरणप्रेमी
फोटो (२१बहुगुणा)
सुंदरलाल बहुगुणा यांचा सत्कार करताना स्वामी संविदानंद सरस्वती.