वीज केंद्र वसाहतीतील पीस पार्कमध्ये टाकाऊ वस्तूंपासून उद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:11 AM2018-08-01T00:11:21+5:302018-08-01T00:11:49+5:30
एकलहरे वीज केंद्र वसाहतीतील पीस पार्क उद्यानामध्ये टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ कलाकृती उभारण्यात आल्या, तसेच खेळण्यासाठी व व्यायामासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पीस पार्कमुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
एकलहरे : एकलहरे वीज केंद्र वसाहतीतील पीस पार्क उद्यानामध्ये टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ कलाकृती उभारण्यात आल्या, तसेच खेळण्यासाठी व व्यायामासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पीस पार्कमुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. एकलहरे वसाहत आॅफिसर्स क्लबजवळील पीस पार्क उद्यानामध्ये मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकाऊ वस्तूंतून टिकाऊ कलाकृती उभारण्यात आल्या आहेत. तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी व सर्वांना व्यायामासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पीस पार्क उद्यानाला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. जनरेटर ट्रान्सफॉर्मरच्या वापरलेल्या बुशिंगपासून बनविलेला रंगीत प्रकाशमय कारंजा, अग्निशमन यंत्रणेच्या साहित्यापासुन पक्षी निवारा घरटे, मोशन सेन्सरद्वारे बनविलेल्या प्रकाश योजनेमुळे ऊर्जा बचत करण्यात आली आहे. पार्कच्या मध्यभागी उंचवटा तयार करून त्यावर लॉन्स लावण्यात येऊन आजूबाजूला गुलाब व शोभेची झाडे लावण्यात आली आहे. पार्कमध्ये फिरण्यासाठी ४३० मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक तयार करून साऊंड सिस्टीम लावण्यात आली आहे. व्यायामासाठी ग्रीन जिम बसविण्यात आली असून मोठ्या वृक्षांच्या सभोवती पार बांधण्यात आल्याने त्यांचा उपयोग योग साधनेसाठी होऊ लागला आहे.
झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन योजनेची व्यवस्था करण्यात आली आहे. सेल्फी काढण्यासाठी स्वयंप्रतिमा कक्ष बाष्पक व बाष्पचक्र दुरुस्ती विभागाकडुन उभारण्यात आला आहे.
रंगीबेरंगी रिबीन, रंगीत छत्र्या व काचेच्या बाटल्यांचे आकर्षक वृक्ष तयार करून सजावट करण्यात आली आहे. कोळसा हाताळणी विभागाने प्लॅस्टिकच्या निरूपयोगी बाटल्यांची सुंदर कमान उभारली असून त्यात रंगीत लायटिंग करण्यात आली आहे.
लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र किलबिल पार्कची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये जुन्या टायरपासून कोंबडा, झुला, सूर्य, बेडूक, हसरे चेहरे, वात कुक्कुट, घसरगुंडी, झोपाळे, सीसॉ आदी खेळणी बसविण्यात आली आहेत.
पीस पार्कचे नूतनीकरण करताना खेळणी, रंगरंगोटी, व्यायामाचे साहित्य, स्वच्छता आदींची योग्य सांगड घालण्यात आल्याने परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
वारली पेंटिंगने सजावट
उद्यानात झाडांच्या अवतीभोवती बांधलेल्या पारावर व इतर ठिकाणी वारली पेंटिंग करून सजावट करण्यात आली आहे. तसेच उद्यानात विश्रामकुटी बांधण्यात आली आहे. जुन्या झाडांच्या ओंडक्यांना आकर्षक रंगकाम करून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.