मालेगावी पाच हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक सूर्यनमस्कार
By admin | Published: February 1, 2015 12:21 AM2015-02-01T00:21:39+5:302015-02-01T00:21:47+5:30
मालेगावी पाच हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक सूर्यनमस्कार
.मालेगाव : रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कारदिनानिमित्त येथील स्व. बाळासाहेब क्रीडा संकुलात सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घालून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले.
येथील क्रीडा भारती, योग विद्याधाम, विवेकानंद केंद्र, पतंजली योग विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने तरुणांमध्ये सूर्यनमस्काराची आवड निर्माण व्हावी तसेच शास्त्रोक्त व्यायाम प्रकार, सूर्यनमस्काराचा प्रसार व्हावा, यासाठी दरवर्षी येथे सामूहिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जाते.
क्रीडा भारतीचे जिल्हा कार्यवाह तुकाराम मांडवडे यांनी क्रीडागीत गायन केले. तहसीलदार दीपक पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रकल्प प्रमुख भाग्येश कासार यांनी प्रास्ताविक केले. भानू कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. रविश मारू यांनी आभार मानले. सर्व शाळांतील सहभागी संघांना सहभागाबद्दल प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले. क्रीडा भारतीचे प्रांतिक उपाध्यक्ष नितीन पोफळे, योग विद्याधामचे अध्यक्ष दिनेशकुमार लोढा, विवेकानंद केंद्राचे डॉ. सुरेश शास्त्री, जयवंत जाधव, पतंजली योग विद्यापीठाचे डी. टी. परचुरे, नलिनी निकम, सौ. माधुरी पाठक, सौ. एम. पी. मोरे, प्रा. नितीन हिरे व्यासपीठावर उपस्थित होते. क्रीडा भारतीचे अध्यक्ष दादा बहिरम, दीपक पाटील, प्रवीण चौधरी, रविराज सोनार, निखील पोफळे, गणेश जंगम, विवेक कासार, शरद चित्ते, प्राचार्य के. ज. चंदन, देवेंद्र अलई, मेघा सूर्यवंशी, ओम शर्मा आदि उपस्थित होते.(वार्ताहर)