नवरात्रोत्सव मंडळांमध्ये वाढ
By admin | Published: September 21, 2016 10:59 PM2016-09-21T22:59:47+5:302016-09-21T23:00:24+5:30
आगामी मनपा निवडणूक : इच्छुकांकडून कार्यक्रमांचे आयोजन
इंदिरानगर : आगामी महापालिका निवडणुकीमुळे गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवास महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव मंडळांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, दांडियाप्रेमींचा उत्साहही शिगेला पोहचणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
सुमारे पाच महिन्यांवर महापालिका निवडणूक येऊ ठेपली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये गणेशोत्सवात वर्गणी देण्याची जणू स्पर्धा सुरू झाली होती. त्यामुळे मंडळांना वर्गणीसाठी धावपळ करावी लागली नाही. ‘श्रीं’च्या आगमन व विसर्जनाची मिरवणूक, विद्युत रोषणाई व सांस्कृतिक आणि स्पर्धाची रेलचेल झाली होती. यामध्ये मंडळाचे कार्यकर्ते जमविणे आणि मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच वर्गणीरूपातही पैशाची खैरात करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही इच्छुक उमेदवारांनी स्वत:च्या छबीचे होर्डिंग्ज प्रवेशद्वारावर उभे करण्याची जणूकाही स्पर्धाच झाल्याचे चित्र दिसून आले होते. हीच संधी पुन्हा इच्छुक उमेदवारांना नवरात्रोत्सवाद्वारे दुसऱ्यांदा आली आहे.
यंदा मात्र मनपा निवडणुकीमुळे नवरात्रोत्सवाच्या मंडळांची संख्या वाढणार आहे. यामध्ये राणेनगर मैदानावर सह्याद्री युवक मित्रमंडळाच्या दांडियाचे आयोजन करणार असल्याच्या हालचाली सुरू आहेत. तशीच परिस्थिती राजीवनगर मैदानावर अष्टविनायक मित्रमंडळाच्या वतीने यंदा दांडियाच्या आयोजनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दांडियाप्रेमींना आकर्षित करण्याचे प्रयत्नइंदिरानगर, कलानगर, विनयनगर, वडाळागाव, समर्थनगर, सदिच्छानगर, सुचितानगर यांसह परिसरात इच्छुक उमेदवारांकडून नवरात्रोत्सवाच्या हालचाली जोमाने सुरू झाल्या आहेत. यामध्ये आॅर्केस्ट्रा, गायन, सिनेकलावंत शो यांची लयलूट करण्यात येणार आहे. त्यामुळे दांडियाप्रेमींची आणि मंडळांची दिवाळीच साजरी होणार आहे. तसेच जास्तीत जास्त दांडियाप्रेमींना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी आकर्षक बक्षिसे रोख तसेच वस्तु स्वरूपात देण्यात येणार आहेत.