औद्योगिक व व्यावसायिक कामगार नाट्य स्पर्धेच्या अनुदानात वाढ
By admin | Published: February 3, 2015 01:19 AM2015-02-03T01:19:51+5:302015-02-03T01:20:22+5:30
औद्योगिक व व्यावसायिक कामगार नाट्य स्पर्धेच्या अनुदानात वाढ
नाशिक : औद्योगिक व व्यावसायिक कामगार नाट्य स्पर्धेच्या अनुदानात वाढ केल्याची घोषणा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गावित यांनी केली. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचनाही त्यांनी दिली. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नवव्या औद्योगिक व व्यावसायिक कामगारांच्या नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नाट्यकर्मींच्या मागणीला प्रतिसाद देत गावित यांनी ही घोषणा केली. महाकवी कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम झाला. नाशिकमध्ये प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक विवेक गरुड, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, सहायक कल्याण आयुक्त संजय धुमाळ व्यासपीठावर उपस्थित होते. नाटकाच्या सादरीकरणासाठी पाच हजारांऐवजी सात हजार, प्रथम विजेत्याला दहा हजारांऐवजी १५ हजार, द्वितीय विजेत्याला सात हजारांऐवजी दहा हजार, तृतीय विजेत्याला पाच हजारांऐवजी सात हजार ५०० रुपये दिले जातील, असे गावित यांनी सांगितले. याशिवाय परीक्षकांचे मानधनही एक हजारावरून दीड हजारापर्यंत, तर आदरातिथ्य खर्चही ४०० वरून ६०० करण्यात आल्याचे त्यांनी घोषित केले.
विवेक गरुड यांनी या कार्यक्रमात खंत व्यक्त केली होती. नाटकांचा खर्च मोठा असून, बक्षिसांची रक्कम मात्र अपुरी आहे. त्यामुळे अनेकांना खिशातून पैसे घालावे लागत असल्याचे ते म्हणाले. या स्पर्धेच्या अनुदानात वाढ करावी, असे आवाहन त्यांनी केले, तसेच ‘नाटक खेळणारी मुलं’ ही कविताही सादर केली. त्यांच्या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत गावित यांनी सुधारित अनुदानाची या स्पर्धेपासूनच अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले. संजय धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेचे परीक्षक विजय खानविलकर, प्रदीप पाटील, शरद तिळवणकर, प्रा. दिलीप जगताप, रोहिणी ढवळे यांचा सत्कार करण्यात आला. कल्याण निरीक्षक महेश विभांडिक यांनी सूत्रसंचालन केले. कामगार कल्याण अधिकारी भावना बच्छाव यांनी आभार मानले.