नासाकासाठी प्राधिकृत मंडळाकडून हमी

By admin | Published: September 17, 2016 12:22 AM2016-09-17T00:22:54+5:302016-09-17T00:26:10+5:30

बैठकीत निर्णय : सरकार करणार कर्जपुरवठा

Guarantee from the authority board for NASA | नासाकासाठी प्राधिकृत मंडळाकडून हमी

नासाकासाठी प्राधिकृत मंडळाकडून हमी

Next


नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू होण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील जाणकार व लोकप्रतिनिधींनीं प्राधिकृत मंडळ स्थापन करून सरकारला कारखाना उर्जितावस्थेत आणण्याची व कर्जाची परतफेड करण्याची हमी दिल्यास राज्य सरकार कारखाना सुरू करण्यासाठी लागणारा कर्जपुरवठा करेल, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.
चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना आर्थिक डबघाईमुळे गेल्या तीन वर्षांपासून बंद असून, जिल्हा बॅँकेने कर्जापोटी बॅँकेची मालमत्ता जप्त केलेली आहे. हा कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात आल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कारखान्याशी संबंधित लोकप्रतिनिधी व जाणकारांची संयुक्त बैठक शुक्रवारी मुंबईत सहकारमंत्र्यांच्या दालनात बोलविली होती. त्यावेळी कारखान्याची एकूण मालमत्ता, कर्ज व भांडवलाची माहिती घेतल्यानंतर विठेवाडी येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या धर्तीवर प्राधिकृत मंडळामार्फत कारखान्याचे व्यवस्थापन करण्याचा मनोदय देशमुख यांनी बोलून दाखविला. कारखाना सुरू व्हावा यासाठी दहा ते बारा व्यक्तींचे मंडळ स्थापन करण्याची सूचना त्यांनी उपस्थितांना केली व या मंडळाने कारखाना चांगल्या पद्धतीने चालविण्याची तसेच कर्जफेड करण्याची हमी शासनाला दिल्यास शासन कोणत्याही वित्तीय संस्थेमार्फत कारखान्याला किमान दहा कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देऊ शकते, असे आश्वासनही त्यांनी दिले. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचेही मोठे देणे असल्याने त्याची हमीही या प्राधिकृत मंडळाने घ्यावी अशी सूचना करून, जिल्हा बॅँकेने कर्जापोटी जरी कारखान्यावर जप्ती केली असली तरी, कर्जासाठी बॅँकेकडून नाहरकत शासन घेईल त्याची चिंता नको असेही देशमुख यांनी सांगितले. येत्या दोन दिवसात प्राधिकृत मंडळाची नावे निश्चित करून शासनाला कळवावे, असे त्यांनी सांगितले व या संदर्भात आमदार बाळासाहेब सानप यांनी पुढाकार घेण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीस खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, निर्मलाताई गावित, देवीदास पिंगळे आदि उपस्थित होते. चालू हंगामात कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

Web Title: Guarantee from the authority board for NASA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.