कुंभमेळा कामांवर पालकमंत्री नाराज
By admin | Published: April 16, 2015 12:28 AM2015-04-16T00:28:15+5:302015-04-16T00:28:33+5:30
कबुली : कामे मात्र वेळेत पूर्ण होणार
नाशिक : कुंभमेळ्याच्या कामांच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित झाला असताना आता पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये त्रुटी असल्याची कबुली देत त्यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कुंभमेळ्याची सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कुंभमेळ्यासाठी महापालिकेने आधी अडीच हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. त्यानंतर राज्य शासनाने त्यात कपात केली आणि एक हजार ५२ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी सध्या सुरू असून, कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. यात अंतर्गत आणि बाह्य रिंगरोड, तसेच साधुग्राममधील मूलभूत सोयीसुविधा, तसेच अन्य दीर्घ योजनांची कामे सुरू आहेत. या कामांच्या दर्जाविषयी वेळोवेळी शंका उपस्थित केली जात आहे. त्यात आता खुद्द पालकमंत्र्यांनीच कामात त्रुटी असल्याची कबुली दिली आहे.
नाशिक दौऱ्यावर आलेले पालकमंत्री महाजन यांनी साधुग्राममध्ये सुरू असलेली शेडची कामे, तसेच शौचालय आणि अन्य कामांची पाहणी केली. घाटाच्या कामांचीदेखील त्यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कुंभमेळ्याची कामे सुरू आहेत. तथापि, अनेक ठिकाणी कामात त्रुटी आहेत. खिळे ठोकण्यापासून शौचालयाच्या भांड्यापर्यंत त्रुटी असल्याचे त्यांनी मान्य केले. या त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. काही कामांसाठी ठरावीक परराज्यातील ठेकेदारच सर्व कामे करतात, त्यांनाच जबाबदारी देण्यात आली असून, कुंभमेळ्याची सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, आमदार बाळासाहेब सानप आणि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)