नाशकातील प्रतिष्ठेच्या लढतीत पालकमंत्र्यांचीच सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:58 AM2019-10-25T01:58:36+5:302019-10-25T01:59:07+5:30
शहरातील तिन्ही जागा मिळवण्यासाठी भाजपाने सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले आणि तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील तिन्ही जागा प्रतिष्ठेच्या केल्या. अखेर त्या तिन्ही जागा भाजपाने जिंकल्या. विशेषत: नाशिक पूर्वमधील जागा जिंकल्याने पालकमंत्र्यांची सरशी झाली.
नाशिक : शहरातील तिन्ही जागा मिळवण्यासाठी भाजपाने सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले आणि तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील तिन्ही जागा प्रतिष्ठेच्या केल्या. अखेर त्या तिन्ही जागा भाजपाने जिंकल्या. विशेषत: नाशिक पूर्वमधील जागा जिंकल्याने पालकमंत्र्यांची सरशी झाली.
नाशिक शहरात भाजपाच्या तीन जागा होत्या. त्या सहजगत्या जिंकण्याची शक्यता असली तरी शिवसेनेने नाशिक पश्चिम मतदारसंघातील एका जागेच्या निमित्ताने युतीत दरी निर्माण झाली होती. शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन फक्त पुरस्कृत उमेदवाराकडेच लक्ष पुरवले होते. तर दुसरीकडे भाजपाने उमेदवारी नाकारल्याने नाशिक पूर्वचे आमदार बाळासाहेब सानप यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपाच्या दृष्टीने निवडणूक प्रतिष्ठेची होती. विशेषत: महाजन यांच्यासाठी पूर्व मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची झाली होती. मात्र, त्यानंतरदेखील अटीतटीच्या लढतीत भाजपाचे राहुल ढिकले विजयी झाल्याने पालकमंत्र्यांचीच सरशी झाल्याचे बोलले जात असून नाशिक शहरातील तीनही जागांवर आपला कब्जा कायम ठेवत गिरीश महाजन यांच्या रणनितीने चांदवड मतदारसंघदेखील भाजपने आपल्याकडे ठेवला आहे. तसेच बागलाण मतदारसंघात राष्ट्रवादीवर मात करत एक जागा अधिकची निवडून आणली आहे.