नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 10:46 PM2020-10-24T22:46:49+5:302020-10-25T01:04:20+5:30
लासलगाव : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी लासलगाव कोविड उपचार केंद्रातील सातही व्हेंटिलेटर्स त्वरित कार्यरत करावीत तसेच लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेचे नवीन पाइपलाइनचे काम होईपर्यंत जुन्या पाइपलाइनचे दुरुस्तीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांनी तातडीने करावे व पावसाने झालेल्या सर्व पिकांचे नुकसानीचे पंचनामे कोणत्याही परिस्थितीत तक्रारी राहणार नाहीत या पद्धतीने अग्रक्रमाने पूर्ण करावेत तसेच रस्ते दुरुस्ती व राहित्रे दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करावेत, असे स्पष्ट आदेश राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

लासलगाव येथील शिवकमल मंगल कार्यालयात आमदार दिलीप बनकर, आमदार किशोर दराडे, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, जि.प. सदस्य डी. के.जगताप, पंढरीनाथ थोरे तसेच येवल्याचे प्रांत सोपान कासार, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्यासह अधिकारी उपस्थितीत शनिवारी (दि. २४) सायंकाळी घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. नांदुर्डी येथील वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या परिवारास विलंब न करता मदत पोहोचविण्याचे आदेशही भुजबळ यांनी तहसीलदारांना दिले.
कोरोना उपचार केंद्राच्या कामात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. येवला तालुक्यापेक्षा निफाड तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या अधिक असली तरी आटोक्यात आहे. मात्र खासगी उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती अद्ययावत ठेवावी, असे आदेश देऊन लासलगाव येथील कोरोना उपचार केंद्रात सर्व व्हेंटिलेटर त्वरित कार्यरत करावेत. अचानक रुग्णांची संख्या वाढली तर त्याचा लागलीच उपचारासाठी फायदा होईल, असे सांगून निफाड व येवला तालुक्यातील रस्ते व रोहित्रे याबाबत अधिकारीवर्ग यांनी लक्ष घालण्याची सूचना त्यांनी केल्या.
लासलगाव येथील सोळा गाव पाणी योजनेला नवीन निधी येईपर्यंत दुरुस्तीकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनाने तातडीने ही योजना ताब्यात घेऊन जुनी पाइपलाइन दुरुस्ती करावी व पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना भुजबळ यांनी केल्या.
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे निर्माण झालेल्या समस्या, केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेली बेरोजगारी, अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे नुकसान त्याचप्रमाणे माझे कुटुंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी आदी विषयासह ऐनवेळी च्या सार्वजनिक समस्येवर चर्चा करण्यात येऊन आढावा घेण्यात आला.
यावेळी गुणवंत होळकर, संतोष ब्रह्मेचा, विनोद जोशी, रतनवाल राका, मिरान पठाण, सोएल मोमीन, डॉ. विकास चांदर, बबन शिंदे यांच्यासह निफाड व येवला तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.