पानी फाउण्डेशनच्या कामाबाबत पालक सचिवांनी केले समाधान व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 06:49 PM2019-05-18T18:49:34+5:302019-05-18T18:50:05+5:30

सिन्नर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती व प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी तालुक्याच्या दौºयावर आलेले पालक सचिव सीताराम कुंटे यांनी टेंभूरवाडी येथे सुरू असलेल्या पाणी फाउण्डेशनच्या कामाला भेट देत समाधान व्यक्त केले.

The Guardian secretaries expressed satisfaction about the work of Water Foundation | पानी फाउण्डेशनच्या कामाबाबत पालक सचिवांनी केले समाधान व्यक्त

सिन्नर तालुक्यातील टेंभूरवाडी येथे पानी फाउण्डेशनच्या कामाची पाहणी करताना पालक सचिव सीताराम कुंटे. समवेत पानी फाउण्डेशनच्या तालुका समन्वयक सुषमा मानकर व स्थानिक पदाधिकारी.

Next

सिन्नर : तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती व प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी तालुक्याच्या दौºयावर आलेले पालक सचिव सीताराम कुंटे यांनी टेंभूरवाडी येथे सुरू असलेल्या पाणी फाउण्डेशनच्या कामाला भेट देत समाधान व्यक्त केले.
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील टेंभूरवाडी (आशापूर) गावाने यंदाच्या वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला असून, सकाळी व संध्याकाळी गावातील सर्व महिला नियमितपणे दोन तास श्रमदान करतात, अशी माहिती पालक सचिवांना देण्यात आली होती. तालुक्यात पानी फाउण्डेशनच्या एखाद्या कामावर भेट देण्याची त्यांनी इच्छा प्रदर्शित केल्यानंतर टेंभूरवाडी येथील कामावर भेट देण्याचा निर्णय झाला. सचिवांचा ताफा टेंभूरवाडी पोहोचल्यानंतर श्रमदान सुरू असलेल्या धनगरी बंधारा तळ्याच्या परिसरात जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने पायपीट करावी लागणार होती. आपल्या वाहनातून उतरून पालक सचिव कुंटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्यासह अधिकाऱ्यांचा लवाजमा पायी निघाला. सरपंच विष्णू पाटोळे, संगीता पाटोळे यांनी पानी फाउण्डेशनच्या माध्यमातून गावाने वॉटरकप स्पर्धेसाठी घेतलेल्या पुढाकाराची व लोकसहभागातून सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. गावाचा परिवार जलयुक्त बनवण्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून लोक एकत्र येत असून, त्यात महिलांचा असणारा पुढाकार वाखाणण्याजोगा असल्याचे कुंटे यावेळी म्हणाले. टेंभूरवाडी येथील सुरू असलेल्या कामांबद्दल कौतुक त्यांनी ग्रामस्थांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
वॉटरकपसाठी टेंभूरवाडी गावाने सहभाग नोंदवला असून, गावाच्या परिसरात प्रभावीपणे जलउपचार करण्यात येत आहेत. दि. ८ एप्रिलपासून प्रत्यक्ष कामांना सुरु वात झाली आहे. कम्पार्टमेंट बंडिंग, माती बांध, दगडी बांध, तलावातील गाळ काढणे, समतल चर खोदणे आदी कामे श्रमदानाच्या माध्यमातून सुरू आहेत. ग्रामस्थ पहाटे व सायंकाळी श्रमदान करतात. गेल्या दोन आठवड्यांपासून गावातील बचतगटांच्या माध्यमातून महिला एकत्र आल्या असून, त्या नियमितपणे श्रमदानात सहभागी होत आहेत. या महिला दररोज दोन तास श्रमदान करीत आहेत. वॉटरकपसाठी गाव एकत्र आले असून, मूल्यांकन तालिका ५० गुणांवर पोहचली आहे.
 

Web Title: The Guardian secretaries expressed satisfaction about the work of Water Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.