खातेप्रमुखांच्या खांद्यावर ‘पालकत्व’
By admin | Published: October 1, 2016 12:55 AM2016-10-01T00:55:34+5:302016-10-01T00:55:54+5:30
ग्रामसभा : १ व २ आॅक्टोबर रोजी विशेष आयोजन
नाशिक : जिल्ह्यात होणाऱ्या १ व २ आॅक्टोबरच्या ग्रामसभांना उपस्थित राहून विकास आराखडा तयार करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांच्या खांद्यावर प्रत्येक तालुक्याची जबाबदारी सोपविली आहे. दोन्ही दिवशी होणाऱ्या ग्रामसभांना उपस्थित राहून ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्यासह ग्रामपंचायतीच्या प्रमुख मागण्यांनुसार आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आदेश केल्यानुसार १ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र महिलांसाठी विशेष ग्रामसभा होणार आहे. तसेच २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभांमध्ये ‘आमचं गाव, आमचा विकास’ या सरकारच्या संकल्पनेनुसार कार्यवाही होते किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी संबंधित तालुका संपर्क अधिकाऱ्यांची राहणार आहे. ग्रामसभेत प्रारूप विकास आराखड्यास ग्रामसभेची मान्यता घेऊन अंतिम होणे आवश्यक आहे. या उपक्रमाचे कामकाज, शासन निर्णय, मार्गदर्शक सूचना याप्रमाणे होणे आवश्यक आहे. उपक्रमाचे कामकाज सुलभ व प्रभावीपणे होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांची प्रत्येक तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संपर्क अधिकाऱ्यांनी संबंधित तालुक्यातील दोन्ही दिवशी ग्रामसभांना उपस्थित राहून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे, तर संबंधित तालुक्याच्या संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या खातेप्रमुखांनी ग्रामसभांना उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. (प्रतिनिधी)
असे आहेत संपर्क अधिकारी
बागलाण- जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रशांत फलक, चांदवड- उपमुख्य कार्यकारी अधिकारी- प्रतिभा संगमनेरे, दिंडोरी- कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, देवळा- प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी देवीदास नांदगावकर, इगतपुरी- मुख्य लेखा व वित्त अधिकारी बोधीकिरण सोनकांबळे, कळवण- कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे, मालेगाव- कार्यकारी अभियंता बापूसाहेब देसले, नांदगाव- प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, नाशिक- उपमुख्य कार्यकारी अधिकारी- राजेंद्र पाटील, निफाड- कृषी विकास अधिकारी हेमंत काळे, पेठ- उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सुरगाणा- कार्यकारी अभियंता मिलन कांबळे, सिन्नर- कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, त्र्यंबकेश्वर- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, येवला- कार्यकारी अभियंता रवींद्र परदेशी आदि खातेप्रमुखांना संपर्क अधिकारी म्हणून नेमणुका देण्यात आल्या आहेत.