गुदामपाल निलंबित; तहसीलदारांचा प्रस्ताव
By admin | Published: January 28, 2015 02:00 AM2015-01-28T02:00:23+5:302015-01-28T02:00:35+5:30
धान्य घोटाळा : गुदाम तपासणीचाही फार्स
नाशिक : सुरगाणा येथील शासकीय धान्य गुदामातील सुमारे पाच कोटी रुपये किमतीच्या धान्य घोटाळा प्रकरणी गुदामपाल रमेश दौलत भोये याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून, तहसीलदार तडवी यांच्यासह अन्य दोघांना निलंबित करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या या घोटाळ्याचा तहसीलदार, प्रांत अधिकाऱ्यांना साधा सुगावाही लागू नये याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. सुरगाणा येथील धान्य घोटाळ्याबाबत अनेक महत्त्वपूर्ण माहिती हाती येऊ लागली असून, अन्नधान्य महामंडळात नेमणुकीस असलेल्या योगेश मंडलिक या प्रतिनिधीने आपल्या जबाबदारीचे पालनच केले नसल्याचे चौकशीत उघड झाले आहे. अन्नधान्य महामंडळातून किती धान्य, कोठे पाठवायचे हे नियतनावरून (कोटा) ठरवून ते धान्य त्याच तालुक्याला रवाना करण्याची जबाबदारी मंडलिक याची असतानाही त्याने अन्य तालुक्यांना पाठवायचे धान्य सुरगाणा तालुक्यात वाहतूक ठेकेदारामार्फत वळते केले. प्रत्यक्षात ठेकेदाराने सदरचे धान्य सुरगाणा गुदामात न उतरविता ते काळ्याबाजारात नेल्याचे चौकशीत दिसून आले.