अनुकंपावरील पन्नास वारसांच्या रखडल्या नियुक्त्या सहायक आयुक्तांकडून मागविले मार्गदर्शन
By admin | Published: April 17, 2015 12:45 AM2015-04-17T00:45:36+5:302015-04-17T00:46:07+5:30
अनुकंपावरील पन्नास वारसांच्या रखडल्या नियुक्त्या सहायक आयुक्तांकडून मागविले मार्गदर्शन
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेवेत कार्यरत असलेल्या मात्र नंतर या ना त्या कारणाने मृत पावलेल्या तसेच आकस्मिक घरी बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्याबाबत सर्व सोपस्कार पूर्ण होऊनही तब्बल ५० वारसांच्या अनुकंपा तत्त्वावरील सेवेत घेण्याचा प्रस्ताव असलेली नस्ती गेल्या काही दिवसांपासून धूळ खात पडल्याचे वृत्त आहे. दरम्यान, याबाबत सामान्य प्रशासन विभागाला विचारणा केली असता २०१२ नंतर अनुकंपा तत्त्वावरील वारसांना सेवेत घेण्याबाबत वाढलेली टक्केवारी व प्रत्यक्षात अनुकंपा तत्त्वावर गेल्या २००८ पासून वारसांना दिलेल्या नियुक्त्या याबाबत माहिती तपासूनच व विभागीय आयुक्त कार्यालयाचे मार्गदर्शन घेऊनच या नियुक्त्या देण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना या ना त्या कारणाने सेवेतून घरी बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अथवा सेवेत असतानाच मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर थेट नियुक्ती देण्याबाबत शासन आदेश होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी सरसकट एकूण भरती करावयाच्या कर्मचाऱ्यांपैकी दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येतात, तर अन्य विभागासाठी हे आरक्षण एकूण भरतीच्या पाच टक्के इतके होते. २०१२ पासून अनुकंपा तत्त्वावर सेवेत घ्यावयाच्या वारसांसाठी हे आरक्षण पाच टक्क्यांवरून दहा टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे.