निवडणूक खर्चाच्या ताळमेळसाठी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 01:18 IST2019-11-10T23:09:07+5:302019-11-11T01:18:00+5:30
विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठीची अंतिम मुदत १९ नोव्हेंबर विहित नमुन्यामध्ये उमेदवारांनी खर्च कसा सादर करावा लागणार आहे. त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नियोजन भवन येथे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती.

निवडणूक खर्चाच्या ताळमेळसाठी मार्गदर्शन
नाशिक : विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठीची अंतिम मुदत १९ नोव्हेंबर विहित नमुन्यामध्ये उमेदवारांनी खर्च कसा सादर करावा लागणार आहे. त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नियोजन भवन येथे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती.
भारत निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार निवडणूक काळात उमेदवारांनी केलेला खर्च निवडणूक खर्च निरीक्षकासमोर सादर करावा लागतो. यासाठी उमेदवारांनी कशाप्रकारे माहिती भरावी आणि खर्चामध्ये कोणते मुद्द्ये अपेक्षित आहेत याची माहिती उमेदवारांना देण्यात आली. खर्च निरीक्षकांनी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना मूळ नोंदवह्या, दैनंदिन हिशेब नोंदी, निवडणूक खर्च गोषवारा आणि शपथपत्र याविषयीचे मार्गदर्शन केले. खर्च सादर करताना त्याच्या सत्यतेसाठी प्रमाणक बिले, खर्च विषयक कागदपत्रे, अभिलेख याची माहिती उमेदवारांना यावेळी देण्यात आली.
ज्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असेल अशा उमेदवारांनादेखील खर्च सादर करावा लागणार आहे. अर्ज दाखल करण्यापासून ते अर्ज माघारीपर्यंत करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील त्यांना द्यावा लागणार आहे. येत्या १९ तारखेपर्यंत उमेदवारांना मतदारसंघनिहाय निवडणुकीचा खर्च सादर करावा लागणार असल्याने त्यासाठीची व्यवस्था जिल्हा निवडणूक शाखेने केली आहे.
माहिती द्यावी लागणार
निवडणूक काळात उमेदवारांनी प्रचारासाठी घेतलेले मेळावे, सभा मिरवणूक, प्रचारकार्य, प्रसार माध्यमे तसेच सोशल मीडियावरील खर्चाची माहिती उमेदवारांना सादर करावी लागणार आहे. पक्षाकडून आलेला फंड आणि कार्यकर्त्यांवर केलेल्या खर्चाची माहितीदेखील उमेदवारांना सादर करावी लागणार असून, त्यासाठीचे शपथपत्रदेखील द्यावे लागणार आहे.