पालक मेळाव्यात मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 10:45 PM2020-01-24T22:45:21+5:302020-01-25T00:25:21+5:30
नामपूर येथील समाजश्री प्रशांतदादा हिरे महाविद्यालयाच्या हिंदी विभागाची व्याख्यानमाला संपन्न झाली. या व्याख्यानमालेचे औचित्य साधून हिंदी विभागाचा पालक मेळावादेखील आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
मालेगाव : नामपूर येथील समाजश्री प्रशांतदादा हिरे महाविद्यालयाच्या हिंदी विभागाची व्याख्यानमाला संपन्न झाली. या व्याख्यानमालेचे औचित्य साधून हिंदी विभागाचा पालक मेळावादेखील आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
पहिले पुष्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जे.वाय. इंगळे यांच्या हस्ते गुंफण्यात आले. इंगळे यांनी शोधप्रक्रिया या विषयावर विचार मांडताना संशोधनाचे महत्त्व विशद करून संशोधनाचे स्वरूप, व्याप्ती आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
द्वितीय पुष्प निमगाव महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. व्ही. डी. सूर्यवंशी यांनी गुंफतांना हिंदी साहित्याच्या प्रारंभिक काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या साहित्यिक विकासावर प्रकाश टाकतांना प्रमुख कवी, ग्रंथ आणि साहित्य प्रकारांचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले.
येवला महाविद्यालयाचे प्रा. के. के. बच्छाव यांनी तृतीयपुष्प गुंफताना आधुनिक काव्याचा विकास आणि गद्य साहित्यातील प्रमुख रचनाकार यांचा परिचय करून दिला. प्रमुख काव्य धारा, तिचा उत्तरोत्तर झालेला विकास तसेच गद्य साहित्यातील प्रमुख साहित्यिक भारतेंदु हरिश्चंद्र, प्रेमचंद, जयशंकर प्रसाद, निराला, महादेवी वर्मा आदी साहित्यकारांच्या योगदानाची माहिती दिली. प्रास्ताविक व संयोजन विभाग प्रमुख प्रा. आर. पी. ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन निकिता खरे हिने तर अतिथी परिचय कंचन राजपुरोहित हिने केले. आभार कल्याणी मोरे व तुषार शेवाळे यांनी मानले. यावेळी प्रा. एच. जी. बच्छाव, डॉ. ए. आर. पवार आदी उपस्थित होते.
या व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. पी. भामरे होते. त्यांनी हिंदी भाषा देशातील युवकांना व्यापाराच्या दृष्टीने ही महत्त्वाची असून, सामाजिक सलोखा जपण्याचे काम हिंदी भाषेमुळे शक्य झाल्याचे सांगितले.