सुदृढ आरोग्याबाबत सटाण्यात मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:27 AM2020-02-15T00:27:33+5:302020-02-15T00:28:55+5:30
सटाणा येथील महाविद्यालयात बहि:शाल मंडळ, पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय ज्येष्ठ नागरिक शिबिर नुकतेच झाले. या अंतर्गत विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.
सटाणा : येथील महाविद्यालयात बहि:शाल मंडळ, पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय ज्येष्ठ नागरिक शिबिर नुकतेच झाले. या अंतर्गत विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन मविप्रचे उपसभापती राघो आहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे होते. शिबिराच्या पहिल्या सत्रात डॉ. प्रकाश जगताप यांनी ज्येष्ठांचे आरोग्य या विषयावर अंतर्गत विविध आजार व त्यांच्या लक्षणांची माहिती दिली. ज्येष्ठांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहार-विहार किती आवश्यक आहे, याचे महत्त्व पटवून दिले. पहिल्या सत्रातील दुसरे वक्ते डॉ. विद्या सोनवणे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी योगाभ्यास या विषयावर माहिती दिली. त्यांनी योग्य प्रात्यक्षिकांसह योगाचे महत्त्व पटवून दिले. ज्येष्ठांसाठी कोणती योगासने वयोमान व आजारानुसार करावीत किंवा करू नयेत याची सखोल माहिती त्यांनी दिली. ज्येष्ठ नागरिक शिबिराच्या द्वितीय सत्रात संत गाडगेबाबा यांचे जीवन व कार्य या विषयावर दिलीप धोंडगे यांनी आपले विचार मांडले. त्यांनी संत गाडगेबाबा यांचा जीवनपट साकारला. बाबांचे अंधश्रद्धाविरोधी कार्य, स्वच्छता, आरोग्य, समाजसेवा, श्रमनिष्ठा, भक्तिभाव आदी सर्व विषयांचा ऊहापोह केला.
द्वितीय सत्रात दुसरे वक्ते अॅड. पंडित भदाणे यांनी ज्येष्ठांसाठी असलेले कायदे, योजना व मार्गदर्शन याविषयी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. त्यामध्ये ज्येष्ठांसाठी असणारे कायदे आणि सध्या त्यामध्ये घडवून आणावयाचे बदल, वकिलांचे योगदान त्यांनी स्पष्ट केले. मृत्युपत्राविषयी सखोल माहिती त्यांनी दिली. या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद पाटील हे होते. याप्रसंगी ज्येष्ठांचे प्रातिनिधिक मनोगत सुरेश नारायण बागड, दगाजी संपत वाघ, जिभाऊ खंडू सोनवणे, पंडित त्र्यंबक सोनवणे यांनी मांडले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. दीपा कुचेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. नीलेश पाटील यांनी केला, तर आभार धनंजय पंडित यांनी मानले.