सूक्ष्म जलसिंचन प्रोत्साहन प्रकल्पांतर्गत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 09:31 PM2020-02-07T21:31:34+5:302020-02-08T00:12:00+5:30
कांदा पिकाचे उत्पादन घेताना पाणी वाचविण्यासाठी पीक उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी सूक्ष्म जलसिंचन पद्धतीचा वापर करावा, असा सल्ला सरदवाडी येथील कृषी सहायक नागरे यांनी दिला.
सिन्नर : कांदा पिकाचे उत्पादन घेताना पाणी वाचविण्यासाठी पीक उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी सूक्ष्म जलसिंचन पद्धतीचा वापर करावा, असा सल्ला सरदवाडी येथील कृषी सहायक नागरे यांनी दिला.
युवा मित्र संस्था व सिजेंटा इंडिया लि. च्या सहकार्याने सूक्ष्म जलसिंचन प्रोत्साहन प्रकल्प राबविण्यात येत आहे. ठिबकवरील कांदा लागवड-खत आणि कीड व रोग व्यवस्थापन तसेच कृषी विभागाच्या योजनांचा मार्गदर्शनासाठी प्रक्षेत्र भेट व पीक पाहणी कार्यक्रम सरदवाडी येथील उत्तम शिरसाठ यांच्या कांदा क्षेत्रात आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. युवा मित्र संस्था २५ वर्षांपासून पाणी व्यवस्थापन, महिला उपजीविका, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अजित भोर, दिनेश ठोंबरे, सुधीर मोराडे उपस्थित होते. मोराडे यांनी युवा मित्रतर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहिती दिली. ठोंबरे यांनी ठिबक संच चालविताना घ्यावयाची काळजी, स्क्रीन फिल्टरची स्वच्छता याविषयी माहिती सांगितली. सिन्नर तालुक्यातील सततचा कमी पडणारा पाऊस व उपलब्ध पाण्याचा काटेकोरपणे वापर करणे, ठिबक सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे व उत्पादनात वाढ करणे या उद्देशाने १५ गावांमध्ये २५० शेतकऱ्यांसोबत २५० एकरावर हा प्रकल्प करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कांदा लागवड करताना रोपवाटिका व्यवस्थापन, ठिबकवरील कांदा लागवड पद्धती, कीड व रोग, त्याचे व्यवस्थापन विद्राव्य खत व्यवस्थापन या विषयावर नागरे यांनी मार्गदर्शन केले.