‘नर्व ब्लॉक्स’ तंत्राचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 01:39 AM2019-12-16T01:39:51+5:302019-12-16T01:40:12+5:30
रुग्णांवर वेदनाविरहित आणि अधिकाधिक सुरक्षित शस्त्रक्रिया करण्यासाठी भूलशास्त्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची भूलतज्ज्ञांना आवश्यकता असते. अशा अद्ययावत ‘नर्व ब्लॉक्स’ तंत्राविषयी कोईम्बतूरचे ख्यातनाम भूलतज्ज्ञ डॉ. बालावेंकट यांनी त्यांच्या टीमसोबत नाशिक विभागातील भूलतज्ज्ञांना विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
नाशिक : रुग्णांवर वेदनाविरहित आणि अधिकाधिक सुरक्षित शस्त्रक्रिया करण्यासाठी भूलशास्त्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची भूलतज्ज्ञांना आवश्यकता असते. अशा अद्ययावत ‘नर्व ब्लॉक्स’ तंत्राविषयी कोईम्बतूरचे ख्यातनाम भूलतज्ज्ञ डॉ. बालावेंकट यांनी त्यांच्या टीमसोबत नाशिक विभागातील भूलतज्ज्ञांना विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
नाशिक शहरात शनिवारपासून सुरू असलेल्या प्रादेशिक भूलतज्ज्ञ कार्यशाळेचा रविवारी (दि.१५) समारोप झाला. या कार्यशाळेच्या माध्यमातून डॉ. बालावेंकट यांनी त्यांच्या टीमसह भूलशास्त्रातील अद्ययावत नर्व ब्लॉक्स तंत्रज्ञानाविषयी वेदांत हॉस्पिटल येथून कार्यशाळेत सहभागी झालेल्या भूलतज्ज्ञांना हॉटेल एसएसके येथे थेट प्रक्षेपणाद्वारे मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यशाळेत सहभागी भूलतज्ज्ञांच्या विविध शंकांचेही बालावेंकट यांनी निरसन केले. तसेच भूलशास्त्रातील वेगवेगळ्या तंत्रज्ञानाविषयीही यावेळी चर्चा करण्यात आली. नाशिक अनेस्थेशिया असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सुनीता संकलेचा यांनी भूलशास्त्रातील अत्याधुनिक तंत्र व त्यातील बारकावे यामुळे हे तंत्र रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक वरदानच ठरत असल्याचे सांगत या तंत्रातील अद्ययावत माहिती भूलतज्ज्ञांपर्यंत पोहचविण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट कार्यशाळेच्या माध्यमातून साध्य झाल्याचे मत व्यक्त केले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत उपासणी, डॉ. गीता तोरणे, डॉ. महेंद्र गुप्ता, डॉ. तुषार नेमाडे आदी उपस्थित होते.