आईच्या ओढीने मुलीची पायी गुजरातवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 09:36 PM2021-10-17T21:36:27+5:302021-10-17T21:37:29+5:30
गणेश शेवरे, पिंपळगाव बसवंत : चुकली दिशा तरीही, ओढ तुझी मिटणार नाही, आई तुझ्या ओढीने, धीर माझा सुटणार नाही. गर्दीत जर आईचा हात सुटला तर आईसह ते मूल किती कासावीस होते. त्याला कितीही लालसा दिली तरीही ते आपल्या आईलाच शोधत असते आणि जेव्हा आई समोर येते तेव्हा ना चॉकलेट, ना आईस्क्रीम ना कुठलीही गोड मिठाईची गरज भासते. त्यापेक्षाही कितीतरी अधिक गोड आनंद असतो तो आईच्या कुशीत विसावण्याचा. अशीच एक हृदयस्पर्शी घटना पिंपळगाव येथील घडली आहे. आईच्या ओढीने गुजरातकडे पायी जाणाऱ्या ११ वर्षीय मुलीला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गणेश शेवरे, पिंपळगाव बसवंत :
चुकली दिशा तरीही, ओढ तुझी मिटणार नाही, आई तुझ्या ओढीने, धीर माझा सुटणार नाही.
गर्दीत जर आईचा हात सुटला तर आईसह ते मूल किती कासावीस होते. त्याला कितीही लालसा दिली तरीही ते आपल्या आईलाच शोधत असते आणि जेव्हा आई समोर येते तेव्हा ना चॉकलेट, ना आईस्क्रीम ना कुठलीही गोड मिठाईची गरज भासते. त्यापेक्षाही कितीतरी अधिक गोड आनंद असतो तो आईच्या कुशीत विसावण्याचा. अशीच एक हृदयस्पर्शी घटना पिंपळगाव येथील घडली आहे. आईच्या ओढीने गुजरातकडे पायी जाणाऱ्या ११ वर्षीय मुलीला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पिंपळगाव बसवंत येथील पोलिसांना परिसरातील वणी रोड येथे एक ११ वर्षांची मुलगी सापडल्याची माहिती मिळाली. लहान मुलगी असल्याने पोलिसांनी तातडीने आणि गंभीरपणे तपास करण्यास सुरुवात केली. तपासात सदर मुलगी गुजरात येथील असल्याचे समजले. एक दाम्पत्य कामानिमित्त निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील प्रगतिशील शेतकरी कुंभार्डे यांच्याकडे आले असता खेळता खेळता त्यांची ११ वर्षांची मुलगी अनिषाबेन दिसेनाशी झाली. काही वेळानंतर ती हरवल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले आणि तिचा शोध सुरू झाला. सकाळी सुरू झालेली ही शोधमोहीम संध्याकाळपर्यंत चालली. तरीही ती आढळून आली नाही. तोपर्यंत तिच्या आईला याची खबर देण्यात आली नव्हती.
दरम्यान, अनिषाबेन मनूभाई दिवा आपल्या आईच्याच ओढीने गुजरातच्या दिशेने पायी निघाली होती. वणीहून पिंपळगावच्या दिशेने येत असलेल्या हट्टी येथील तरुण कैलास धुळे यांना सदर मुलगी अंतरवेली फाट्यावर पिंपळगावच्या दिशेने येताना दिसली. मुलगी रडत असल्याने त्यांनी तिची विचारपूस केली तर तिच्या भाषेवरून ती गुजरातची असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी तिला नागरिकांच्या मदतीने पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावशे यांच्याशी संपर्क साधून स्वाधीन केले.
पावशे यांनीही तातडीने तिच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यास सुरुवात केली अन् अवघ्या तासाभरात ही शोधमोहीम थांबली. पोलिसांनी चिमुकलीला पोलिसांच्या स्वाधीन केले तेव्हा कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. याप्रसंगी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रामदास गांगुर्डे, चंद्रभागा कराड आदी उपस्थित होते.
आईची माया आणि ओढ काय असते याची अनेक उदाहरणे आजपर्यंत बघितली आहेत. मात्र नवरात्रात त्या वाट चुकलेल्या चिमुकल्या नवदुर्गाच्या घरच्यांचा शोध लावत तिला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करताना जो अनुभव मिळाला तो मन प्रसन्न करणारा होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या हातून एक चांगले काम घडल्याचे समाधान मिळाले.
- पुंडलिक पावशे, पोलीस उपनिरीक्षक
फोटो- १७ पिंपळगाव पोलीस