वाहतूक पोलिसांनी दिले तिळगूळसह गुलाबपुष्प
By admin | Published: January 15, 2017 01:19 AM2017-01-15T01:19:47+5:302017-01-15T01:20:37+5:30
हॅप्पी संक्रांत : रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत अशीही गांधीगिरी
नाशिक : एरवी वाहतूक पोलिसांकडून नागरिकांच्या हातात केवळ दंडात्मक कारवाई केल्याच्या पावत्या दिल्या जातात. मात्र, शनिवारी मकरसंक्रांतीचे औचित्य साधत वाहतूक पोलिसांनी विविध सिग्नलवर हेल्मेटधारक दुचाकीस्वारांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्याने नाशिककरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांच्या जनप्रबोधनाची गांधीगिरी बघून नागरिक अवाक् झाले.
रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत विविध आगळेवेगळे जनप्रबोधनाचे उपक्रम वाहतूक पोलिसांकडून सध्या शहरात राबविले जात आहेत. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने मकरसंक्रांतीचे औचित्य साधत शनिवारी हेल्मेटधारक दुचाकीस्वारांना विविध सिग्नलवर पोलिसांनी गुलाबपुष्प व तिळगूळ वाटप करत ‘हॅपी संक्रांत’ म्हणून शुभेच्छा दिल्या.
दुचाकी चालविताना ‘हेल्मेट वापरा, अपघातात होणारा मृत्यू टाळा,’ ‘हेल्मेट है जरूरी, ना समजो इसे मजबुरी’, ‘सीट बेल्ट वापरा, सुरक्षित राहा,’ दारू पिऊन वाहने चालवू नका, ‘रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना प्रथम प्राधान्य द्या’, ‘वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा’ अशा प्रकारच्या सूचना देत शुभेच्छा दिल्या. तसेच तिळगुळासोबत छापील सूचनांचे शुभेच्छापत्रही वाटप करण्यात आले. पोलिसांची ही गांधीगिरी बघून बहुतांश लोक थक्क झाले. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे नागरिकांनी पालन करावे, हा रस्ता सुरक्षा सप्ताहचा मुख्य उद्देश असून, या अंतर्गत वाहतूक नियंत्रण शाखा विविध उपक्रम राबवित आहे.
वाहनांना प्रबोधनपर स्टिकर लावणे, हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांकडून निबंध लिहून घेणे तसेच त्यांना मोफत भविष्य सांगणे अशा प्रकारचे गांधीगिरी स्टाईलने सध्या वाहतूक पोलिसांकडून जनप्रबोधन केले जात आहे.