गुलाबाई उत्सवात रंगल्या महिला
By Admin | Published: September 30, 2016 01:24 AM2016-09-30T01:24:10+5:302016-09-30T01:26:02+5:30
गुलाबाई उत्सवात रंगल्या महिला
मालेगाव : गाणी, मनोरंजक खेळ, स्पर्धांचे आयोजनसंगमेश्वर : ग्रामदैवत गुलाबाईच्या उत्सवाला परिसरात उधाण आले असून, महिलावर्ग या उत्सवात रंगून गेल्या आहेत.
गणपती विसर्जनानंतर परिसरात ग्रामदैवत गुलाबाईची ठिकठिकाणी स्थापना करण्यात आली. महिलांनी गुलाबाई मंडळाची निर्मिती करून चौकाचौकात गुलाबाईच्या मूर्तीची विधिवत स्थापना केली आहे. संगमेश्वरातील नवा होळी चौक, गिते चाळ, वडगे गल्ली, जगताप गल्ली, पाटीलवाडा, ज्योतीनगर, पाटकिनारा, काकूबाईचा बाग आदि भागात महिला एकत्र येऊन यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवित आहेत. रोज सकाळी गुलाबाईची आरती, विविध मनोरंजक खेळ, गाणी, प्रसाद वाटप यात रंगून गेल्या असल्याचे दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत महिला व मुलीचा यात सहभाग लक्षणीय आहे. या खेळातून सांघिक वृत्ती वाढत असून, रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना चांगला विरंगुळा मिळून त्यांच्यावरील कामाचा बोजातून त्यांना निखळ आनंदाची अनुभूती मिळत आहे. संगमेश्वर शिवाय कलेक्टरपट्टा, सटाणा नाका, नववसाहत, सोयगाव कॅम्प आदि भागात गुलाबाई उत्सव जोमात सुरू अहे. येत्या शुक्रवारी ठिकठिकाणी महाप्रसादाचे कार्यक्रम होऊन गुलाबाई उत्सवाची सांगता होणार आहे. (वार्ताहर)