गुलाबालाही नोटाबंदीचा फटका
By admin | Published: January 18, 2017 11:41 PM2017-01-18T23:41:13+5:302017-01-18T23:41:32+5:30
निर्यातीचा आधार : गतवर्षीच्या दुष्काळामुळे उत्पादन घटूनही बाजार घसरले
नामदेव भोर : नाशिक
केंद्र सरकारने जुन्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटांबर बंदी घातल्याचा फटका गुलाब शेतीलाही बसला असून, नागरिकांनी घरगुती कार्यक्रम तथा लग्नसमारंभामध्ये गुलाबांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे गुलाबाच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घट झाली असून, व्हॅलेंटाइन डेच्या कालावधीत सरासरी १५ ते १७ रुपयांचा गुलाब ५ ते ६ रुपयांनी विक्री होत असल्यामुळे गुलाब उत्पादक शेतकरी निर्यातीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. युरोपीय राष्ट्रांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे गोठवणाऱ्या थंडीत आणखीनच वाढ झाली असून, चहुकडे बर्फाळलेल्या पांढऱ्या शुभ्र वातावरणाने वेढलेल्या पाश्चिमात्य देशांमध्ये ख्रिसमसनंतर सध्या ‘व्हॅलेंटाइन डे’ ची धूम असल्याने प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गुलाबांना प्रचंड मागणी असते. याच कालावधीत देशात नोटाबंदीचा फटका बसल्यामुळे गुलाबाच्या फुलांना मागणी घटली आहे. त्यामुळे बाजार भावातही घसरण झाली आहे. गतवर्षी दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी गुलाबाच्या बागा काढल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. तरीही फुलांचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांसमोर फुलांच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत गुलाब उत्पादकांनी फुलांची निर्यात करण्यालाच अधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून निर्यातीचे प्रमाण वाढले असून, ‘व्हॅलेंटाइन डे’च्या कालावधीत सुमारे ३९ ते ४० लाख फुलांची निर्यात होण्याचा अंदाज निर्यातदार संस्था व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)