पोलिसांच्या वरदहस्तामुळे गुंडगिरी फोफावली
By admin | Published: November 26, 2015 10:33 PM2015-11-26T22:33:41+5:302015-11-26T22:34:39+5:30
प्रभाग १७ : दिनकर पाटील यांचा आरोप
नाशिक : प्रभाग क्रमांक १७ मधील श्रमिकनगर, गंगासागरनगर, राधाकृष्णनगर, विष्णूनगर, धु्रवनगर, धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर या भागात फोफावलेल्या गुंडगिरीला पोलीसच जबाबदार असून, त्यांच्या वरदहस्तामुळेच प्रभागात गुंडगिरी बोकाळली असून, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे प्रभागात तातडीने शांतता बैठक घ्यावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक दिनकर व लता पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिले.
सातपूर भागातील गुन्हेगारीच्या आकडेवारीचा आलेख वाढत असून, त्यामध्ये प्रभाग १७ मधील नगरांचा अधिक सहभाग आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या भागात पाच खुनांच्या घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येणाऱ्या-जाणाऱ्यांची खोड काढणे, महिलांची छेड काढणे असे प्रकार नित्यनियमाने घडत असल्याने सायंकाळी सात वाजेनंतर महिलांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. दरम्यान, याबाबत वेळोवेळी गंगापूर तसेच सातपूर पोलीस ठाण्यात निवेदने देऊन गुंडांवर कारवाई करण्याची मागणी केली; मात्र पोलिसांकडून याची दखलच घेतली जात नसल्याने गुंडगिरी फोफावली आहे. गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर काळे यांना प्रभागातील नागरिकांनी गुंडांच्या नावाची यादी दिली आहे, तरीदेखील ते कारवाईस टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्या भूमिकेविषयी शंका वाटत असल्याचा आरोपही यावेळी निवेदनात केला आहे. प्रभागातील कायदा व सुव्यवस्थेची घडी नीट राहावी याकरिता तातडीने शांतता बैठक घ्यावी, अशी मागणी यावेळी पाटील दाम्पत्याकडून करण्यात आली.