मालेगावी सव्वा लाखाचा गुटखा जप्त
By admin | Published: October 20, 2015 10:11 PM2015-10-20T22:11:18+5:302015-10-20T22:12:58+5:30
मालेगावी सव्वा लाखाचा गुटखा जप्त
आझादनगर : मालेगाव शहरातील किदवाई रस्त्याजवळ राहत्या घरी पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक लाख ३० हजारांचा गुटका व सुगंधी तंबाखूचा माल जप्त केला आहे.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सुहास जिभाऊ मंडलिक यांनी फिर्याद दिली. शाहीदखान प्यारेखान यास पोलिसांनी अटक केली आहे. महिनाभरात सुमारे २० लाखांचा गुटका जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस अधीक्षक सुनींल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक बी. डी. बागूल यांच्या पथकाने किदवाई रस्त्याजवळील कुंभारवाडा (तकीया) येथे दुपारी दोन वाजता एका राहत्या घरी छापा मारला.
घराची झडती घेतली असता गुटका व सुगंधीत तंबाखू गोण्यात साठविलेले आढळून आली. तसेच घराच्या छताच्या पत्रावरही हा साठा लपवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी छताच्या पत्र्यांवर चढून गुटका ताब्यात घेतला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शाहीद खान प्यारे खान (४५) रा. कुंभारवाडा घर नं. ३१० यास अटक करण्यात आली आहे. हवालदार एस. एस. जगदाळे, हर्षल खांडेकर, इमरान सैय्यद, गिरीष बागूल यांचा पथकात समावेश होता. (वार्ताहर)
एक महिन्यात चार ठिकाणी छापा
पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एका महिन्यात चार ठिकाणी छापा टाकून १९ लाख ८४ हजार २३५ रुपयांचा गुटका व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली असून लाखोंचा मुद्देमालही जप्त केला आहे.