सुरगाण्यात २९ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 01:13 AM2019-04-10T01:13:47+5:302019-04-10T01:18:26+5:30
सुरगाणा : येथून बावीस किमी अंतरावरील महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या निंबारपाडा येथील चेक नाक्यावर सुरगाणा पोलीस व निवडणूक भरारी पथक यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत ट्रकमधून महाराष्ट्रात येणारा अकरा प्रकारचा गुटखा व ट्रक असा २९ लाख ७८ हजार रु पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सोमवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान गुजरातमधील धरमपूरकडून ट्रक क्र . एमएच ४८ एजी ३९४२ हा चेक नाक्यावर आला असता पोलिसांनी आत काय असल्याचे विचारले असता चालकाने रिकामे कॅरेट भरलेले आहेत असे सांगितले; मात्र पोलिसांना संशय आल्याने ट्रकची तपासणी केली असता मागील भागात रिकामे कॅरेट तर पुढील भागात प्लायवूडचे पार्टिशन करून भरून लाखो रु पयांचा गुटखा पोत्यांमध्ये ठेवण्यात आला होता. ट्रक चालक अबू सलीम खान (२६) रा.नसोपूर, जि. महू, उत्तर प्रदेश यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी दुपारनंतर अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे हे आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली. यावेळी अकरा प्रकारचा २९ लाख ७८ हजार रु पयांचा गुटखा पोत्यांमध्ये भरलेला मिळून आला. सदर ट्रकचा संशय आल्याने पोलीस व भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे सदर कारवाई केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असूनही ट्रकमधून गुटखा वाहतूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा अर्थ याआधीही याबाजूने अशी गुटखा वाहतूक झाली असावी अशी चर्चा आहे.
फोटो - सुरगाणा येथे जप्त करण्यात आलेला गुटखा. समवेत अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे, पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, पोलीस कर्मचारी व निवडणूक भरारी पथकातील अधिकारी.
(फोटो ०९ सुरगाणा २)