धान्य गुदामातील घुशी !
By किरण अग्रवाल | Published: December 2, 2018 12:30 AM2018-12-02T00:30:54+5:302018-12-02T00:35:09+5:30
नाशिक जिल्ह्यातील बहुचर्चित रेशन धान्य घोटाळ्यातील संशयितांची संख्या तब्बल ८४वर पोहचल्याने आणि त्यात पुन्हा काही तहसीलदारांसारख्या उच्च पदस्थांची भर पडल्याने, गुदामातील अन्न-धान्याचा तेथील उंदीर अगर घुशींनीच नव्हे तर द्विपादांनीही फडशा पाडल्याचे स्पष्ट व्हावे.
नाशिक जिल्ह्यातील बहुचर्चित रेशन धान्य घोटाळ्यातील संशयितांची संख्या तब्बल ८४वर पोहचल्याने आणि त्यात पुन्हा काही तहसीलदारांसारख्या उच्च पदस्थांची भर पडल्याने, गुदामातील अन्न-धान्याचा तेथील उंदीर अगर घुशींनीच नव्हे तर द्विपादांनीही फडशा पाडल्याचे स्पष्ट व्हावे.
रेशन दुकानाद्वारे केल्या जाणाऱ्या स्वस्त धान्य पुरवठ्यातील सावळा गोंधळ आजवर कायम टीकास्पद ठरत आला आहे. आता या पुरवठा प्रणालीला पारदर्शक करण्यासाठी संगणकीकृत ‘पॉस’ यंत्रणा कार्यान्वित झाल्याने गडबडीला अटकाव झाला आहे; पण पूर्वी रेशनच्या धान्याची काळ्याबाजारात सर्रासपणे विक्री चालायची. हे रॅकेट केवळ दुकानदारांच्याच पातळीवर होते अशातला भाग नाही, तर ते अन्न महामंडळाच्या गुदामातून निघतानाच कसे खुल्या बाजारापर्यंत पोहोचत असे याचा भंडाफोड सुरगाणा धान्य घोटाळा प्रकरणातून झाला. यात दुकानदार, ठेकेदार, वाहतूकदार व अगदी अधिकारीदेखील सहभागी राहिल्याचे या प्रकरणातून पुढे आले, त्यावर विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडली जाऊन पुरवठा अधिकाºयासह ७ तहसीलदार निलंबित केले गेल्याने संपूर्ण राज्यातीलच पुरवठा यंत्रणा खडबडून जागी झाली. याच प्रकरणात आता पाच तहसीलदारांसह ४९ संशयितांची नव्याने भर पडल्याने या घोटाळ्याची व्याप्ती वाढून गेली आहे. तीन वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या या घोटाळ्यात वर्ग एकच्या दर्जाचे अधिकारी अडकल्याचे पाहता सरकारी यंत्रणेतील झारीतले शुक्राचार्य उघड होऊन गेले आहे. या दीर्घ कालावधीत आता पुन्हा काही तहसीलदारांसह अन्य अधिकाºयांची संशयित म्हणून भर पडल्याने पुरवठा खात्यात किती दलदल होती हेच अधोरेखित व्हावे. अर्थात, कोणत्याही प्रकरणातली संशयितांची संख्या वाढते तेव्हा आरोप सिद्ध करणे कठीण होऊन बसते. प्रस्तुत प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाºयाकडे सोपविलेला असल्याने काटेकोरपणे त्याचा तपास सुरू आहे खरा, तथापि तो तडीस जावा इतकेच यानिमित्त.