गुरु वंदना : अभिजात संगीत साधनेचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:20 AM2019-02-01T00:20:11+5:302019-02-01T00:21:03+5:30
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतकलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने गुरुवर्य पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवार, दि. १ फेब्रुवारी रोजी ‘गुरुवंदना’ या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ५ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे करण्यात आले आहे. यंदाचे एकोणाविसावे वर्ष आहे. त्यानिमित्त.
पंडित शंकरराव वैरागकर हे केवळ एक कलाकार न राहता एक चालती-बोलती संस्था आहेत. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील हजारो रसिक जाणकारांनी त्यांच्या कलेवर भरभरून प्रेम केले व हृदयाच्या कोपऱ्यात त्यांच्यासाठी एक विशेष स्थान दिले. हजारो लोकांच्या हृदयात स्थान मिळवायला प्रचंड कष्टांची जोड असते, सातत्य असते आणि त्याग असतो. जवळजवळ ३०-३२ वर्षांपूर्वी वैरागकर सरांनी गुरु वंदना हा कार्यक्र म सुरू केला.
पुणे, कलकत्ता अशा कलेचे माहेरघर असलेल्या शहरांमध्ये मैफली गाजविलेला, अतिशय उच्च गुरुंकडे संगीताची तालीम घेतलेला आणि स्वत:ला जन्मजात प्रतिभावान वारसा मिळालेला एक तरु ण कलाकार निफाड जवळील भाऊसाहेबनगर या छोट्याशा गावात नोकरीच्या निमित्ताने आला आणि शहरातली सगळी चमक सोडून खेड्याकडे वळला. शेकडो खेड्यांमध्ये शास्त्रीय संगीताचा यज्ञ पेटविला. तो यज्ञ गेली पस्तीस वर्षे सतत चालू आहे. एक नावाजलेला युवा कलाकार ज्याला छोट्या गावात नोकरी मिळाली, आता माझ्या सांगीतिक प्रगतीचे काय? असा विचार करून निराश न होता गावोगावी भटकंती करून लोकांना शास्त्रीय संगीताचे महत्त्व पटवून देऊन, त्यांना समजेल अशा लिपीमध्ये (क्लिष्ट लिपी सोपी करून) अभंग, गौळणीच्या रूपातून रागांची, आलाप, ताना, लय-तालाचे ज्ञान त्या गरीब, शेतकरी कुटुंबातल्या मुलांना, मोठ्या माणसांना शिकवायला सुरु वात केली. तो काळ होता साधारण १९८०-८१ चा. हळूहळू लोकांना संगीताची गोडी लागली. तो दूरदर्शनचा जमाना होता. दूरदर्शनवर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम लागल्यानंतर टीव्ही बंद व्हायचे. अशी परिस्थिती हळूहळू तिथे बदलू लागली. घरोघरी बाजाची पेटी आणि तबल्याचे बोल वाजू लागले, मुले गाणी गुणगुणू लागली, युवा पिढी भावगीते गाऊ लागली, मोठी माणसे भजने आळवू लागली, आणि निफाड तालुक्यातील वातावरण संगीतमय व्हायला सुरुवात झाली. गावोगावी चर्चा होऊ लागल्या, कोणीतरी पुण्याहून वैरागकर सर आलेत, खूप छान संगीत शिकवतात, अशी माहिती पसरू लागली. वैरागकर सरांचा तो पंचविशीतला काळ होता. तरुण सळसळते रक्त, अंगात शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करून दाखवायची उर्मी आणि घरातले आध्यात्मिक संस्कार या गुणांवर गावोगावी भजनाबरोबरच नाट्यसंगीत, ठुमरी, दादरा यांचेही कार्यक्रम घडू लागले. भजनातली ठाय सादर करताकरता ‘‘जय जय रामकृष्ण हरी’’ चा विस्तार करता-करता रागांची माहिती देणे, रागांवर आधारित चाली बांधणे, अशा स्वरूपात रागदारी संगीताची ओळख त्यांनी खेडोपाड्यातील संगीत साधकांना करून दिली.
दरवर्षी नवीन विद्यार्थी अशी परंपरा सुरूच होती. शाळेच्या नेमून दिलेल्या वेळेपेक्षा तीन-चार तास जास्त थांबून रविवारीसुद्धा काम करून शाळेचा वाद्यवृंद सातत्याने चालविला. नोकरी सांभाळून विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा कानाकोपºयातल्या गावांमधून कार्यक्रमांचे दौरे चालूच होते. अवघ्या महाराष्ट्रात रसिकांशी ऋणानुबंध जोडले जात होते. ही काम करण्याची, भ्रमंतीची, गायनाची अचाट शक्ती कुठून येत असेल? माणसे जोडण्याची प्रचंड इच्छाशक्ती त्यातूनच गुरु वंदना ही संकल्पना उदयास आली.
गुरु वंदना म्हणजे गुरुंना गुरु दक्षिणा देऊन केलेली मानवंदना! वैरागकर सरांना गुरु दक्षिणा म्हणून फक्त एकच गोष्ट अपेक्षित असायची, ती म्हणजे त्यांनी वर्षभर जे शिकविलेले आहे त्याचे रंगमंच प्रदर्शन त्यांच्या शिष्यांनी सार्थपणे करावे. गुरुवंदना या कार्यक्रमातून सर्व शिष्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी प्राप्त होऊ लागली. सन १९८५-१९९९ म्हणजेच साधारण १४ वर्षे गावोगावी होणारा कार्यक्रम अजूनही त्यांचे ज्येष्ठ शिष्य आपापल्या गावात आयोजित करतात. वैरागकर सर सन २००० मध्ये नाशिकरोड येथे स्थायिक झाले. त्यांची संगीत प्रसारासाठीची भ्रमंती नाशिक जिल्हाभर होऊ लागली. त्यात नाशिकसह परिसरातील गावे, नाशिकरोड, एकलहरे, विहितगाव, गिरणारे, नांदूर, इगतपुरी, घोटी, सिन्नर, देवळाली गाव, भगूर, पालखेडा अशा अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष स्वत: जाऊन हजारो विद्यार्थ्यांना संगीत अध्यापनाचे कार्य अखंडपणे चालू झाले. ते आजतागायत हा संगीत अध्यापनाचा महायज्ञ चालू आहे. सध्याच्या या ३० ते ३५ वर्षांतील काळात असा संगीत अध्यापनाचा वसा घेऊन अवघ्या महाराष्ट्रभर अविश्रांतपणे फिरस्ती करणारा असा मनस्वी कलाकार म्हणजे पं. शंकरराव वैरागकर. अवघा महाराष्ट्र त्यांना ‘‘आप्पा आणि वैरागकर सर’’ म्हणून ओळखतो.
गुरु वंदना कार्यक्र माचे सुरु वातीचे स्वरूप थोडे वेगळे होते. त्यात सर्व शिष्यांना त्यांनी वर्षभर केलेल्या संगीत साधनेचे प्रतीक म्हणून काही तरी राग, भजन, नाट्यसंगीत, ठुमरी अशाप्रकारचे सादरीकरण करावे लागत असे. साधारण जुलै महिन्याच्या व्यास पौर्णिमेला हा कार्यक्रम व्हायचा. संध्याकाळी ५ वाजता सुरू झालेला हा महोत्सव साधारण मध्यरात्री ३ ते ४ वाजेपर्यंत चालायचा. यात ५० पेक्षा जास्त कलाकार (आप्पांचे शिष्य) सहभागी व्हायचे. असा कार्यक्रम अजूनही होतो; परंतु सर्व शिष्यांना नावाजलेल्या कलाकारांची कला ऐकायला मिळावी या उद्देशाने याचे स्वरूप बदलले गेले व याचा अधिक विस्तार होत गेला. यामध्ये उभारते कलाकार तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांना निमंत्रित केले जाते. गुरुवंदना हा कार्यक्रम २००० पासून नाशिक येथील परशुराम साईखेडकर सभागृहात सादर होत आहे. आतापर्यंत गेल्या १७ वर्षांमध्ये अनेक कलाकारांनी या कार्यक्र मात सहभागी होऊन गुरु वंदना कार्यक्रमाची प्रतिष्ठा वाढविली आहे. त्यामध्ये पं. पद्माकर कुलकर्णी, पं. सुरेशदादा तळवलकर, विदुषी आरती अंकलीकर, पं. उपेंद्र भट, पं. विजय घाटगे, सत्यजित तळवलकर, मेघना कुलकर्णी, रामदास पलुस्कर, गायत्री जोशी, माया मोटेगावकर, तन्मय देवचक्के, मिलिंद कुलकर्णी, सचिन पटवर्धन, अविराज तायडे, मकरंद हिंगणे, जगदीश वैरागकर, रागेश्री वैरागकर, आनंद अत्रे, नितीन वारे, व्यंकटेश धवन, प्रमोद भडकमकर, संदीप घोष, कुमार मरडूर, शाकीर खान, कुणाल गुंजाळ, जितेंद्र गोरे, मुकेश जाधव आदी कलाकारांनी या मंचावर आपली कला सादर केली आहे.
- सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर,
विश्वस्त, गुरु वर्य पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठान, नाशिक.