गुरुसेवेचेही रेटकार्ड!
By Admin | Published: September 5, 2015 11:38 PM2015-09-05T23:38:14+5:302015-09-05T23:38:39+5:30
सेवेचे मोजा मोल : चतुर्मासात आर्थिक सहवास
संजय पाठक , नाशिक
गुरुंच्या कृपेसाठी काय हवे... दोन हात अन् तिसरे मस्तक, अशा जुनाट कल्पनांमधून आता बाहेर पडण्याचे दिवस आहेत. ज्या श्रद्धापूर्ण अंत:करणातून ईश्वराच्या सेवेकडे जाण्याचे मार्गदर्शन करणाऱ्या गुरुंची सेवा करावी आणि गुरु सेवा हीच ईश्वर सेवा समजावी, त्या गुरुंची सेवा आता आर्थिक निकषावर होऊ लागली आहे. ही कल्पनाही नवीन नसली तरी नाशिकमध्ये यंदा कुंभमेळ्याच्या निमित्ताने एकापाठोपाठ गुरुंचे आगमन होत आहे, त्यातील बहुतांशी गुरुंनी छापलेल्या रेटकार्डमुळे आता गुरुसेवा सशुल्कच होऊ शकते, असाच एक संदेश पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निमित्त आहे ते कुंभमेळा आणि चतुर्मासाचे ! नाशिकमध्ये एकापाठोपाठ अनेक धार्मिक गुरु दाखल झाले असून, आणखी काही लवकरच दाखल होत आहेत. त्यानिमित्ताने प्रवचन आणि सत्संगाचा अनोखा योग साधला जाणार असला तरी अनेक धार्मिक गुरुंनी सशुल्क सेवेची अट घातल्याने गुरुंची ‘आर्थिक’ पर्वणी, परंतु भाविकांना मात्र भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एरव्ही मोहमायापासून दूर असणाऱ्या धर्मगुरुंच्या या द्रव्यासक्तीमुळे भाविकांना मात्र द्रव्याशिवाय भक्ती नाही या कलियुगातील नव्या मंत्राला सामोरे जावे लागणार आहे.
बारा वर्षांनंतर भरणारा सिंहस्थ कुंभमेळा यंदा नाशिकमध्ये भरला आहे. गेल्या १४ जुलैला सिंहस्थ पर्वाला प्रारंभ झाला. त्यानंतर खास कुंभमेळ्यासाठी साकारण्यात आलेल्या साधुग्राममध्ये आखाडे आणि खालशांना जागावाटप झाल्यानंतर त्याचे साधू-महंतांचे आगमन होऊ लागले आहे. दुसरीकडे कुंभमेळ्यातील आखाड्यांशी थेट संबंध नसलेल्या; परंतु विविध संस्थाने आणि मठ असणाऱ्या धार्मिक गुरूंनी नाशिकमध्ये डेरा जमवला आहे. आपल्या खास शिष्यांकरवी नाशिकमध्ये तात्कालिक सेवा समित्या स्थापन करून या धर्मगुरुंनी डेरा जमविला आहे.
साधू-महंतांबरोबरच अशा प्रकारच्या अध्यात्मिक गुरुंच्या आगमनाप्रीत्यर्थ मिरवणुका, शोभायात्रा या माध्यमातून त्यांचे श्रद्धावैभव दिसून येत आहे; शिवाय कुंभमेळ्याच्या रामरगड्यात जाऊन सर्वांपैकी एक न होता गंगास्नान करून हे गुरुआत्ताच पावन होत आहेत. या गुरुंचे शहरात विविध ठिकाणी प्रवचन आणि सत्संगाचे कार्यक्रमही होत असून, त्याविषयी कोणाचे दुमत नाही. मात्र अनेक गुरुंनी भाविकांसाठी सशुल्क सेवेचे दरपत्रकच जाहीर केले आहे. साध्या गुरुदर्शनाने पुनीत होतानाही भाविकांचा हात श्रद्धेने खिशाकडे जातोच; परंतु त्यापलीकडे जाऊन वंदनापासून पूजाअर्चा कार्यात सहभागी होण्यासाठी थेट रेटकार्डच जाहीर केले आहे. पादुकापूजा, फलसमर्पण, चतुर्मास सेवा, अन्नदान अशा सर्व प्रकारच्या सेवांसाठी एकशेएक रुपयांपासून दहा हजार एक रुपयांपर्यंतचे रेटकार्डच छापण्यात आले आहे. त्यामुळे गुरुसेवेचा लाभ झाला; परंतु त्याचबरोबर आर्थिक सेवाही बजवावी लागणार आहे. अर्थात, या सक्तीपलीकडे गुप्तदान देणारे किंवा देणारा आणि घेणारा यांनाच ज्ञात असलेली दक्षिणा, वर्गणी वा शुल्क हे अद्याप रेटकार्डवर नाही, त्याचा विचार केल्यास चतुर्मासात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचे भाकित अलीकडेच एका आर्थिक सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीने केले आहे. त्यातून सर्वसामान्यांना किती लाभ मिळेल हे माहिती नाही. मात्र, धार्मिक संस्थांची उलाढाल यात निश्चितच लक्षणीय असेल, असे स्पष्ट दिसत आहे.
तेल ओतायला पैसे, नारळाच्या आहुतीही सशुल्क
कुंभमेळ्यात साधुग्रामजवळच आखाड्याशी संबंधित नसलेल्या एका आध्यात्मिक गुरुने नाशिकमध्ये हिमालयाइतका मोठा मंडप साकारला आहे. येथे सुरू केलेल्या महायज्ञात एक कोटींवर नारळांची आहुती द्यायची आहे, त्यासाठी एका नारळाला ४0 रुपये, तर अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी तेल अर्पण करण्याचे दर चाळीस रुपयांपासून १२0 रुपये इतके ‘माफक’ आहेत.