गुरुकुल शिक्षणाला प्राधान्य द्यावे : मुकुल कानिटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:26 PM2017-11-26T23:26:21+5:302017-11-27T00:34:22+5:30
शाळेतील चार भिंतीच्या वर्गात संस्कारमय शिक्षण दिले जात नाही, तर भारतीय शिक्षणात बदल करण्यासाठी गुरुकुल पद्धत उपयुक्त आहे. भारतातही गुरुकुल शिक्षण पद्धतीला प्राधान्य देण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी केले.
नाशिक : शाळेतील चार भिंतीच्या वर्गात संस्कारमय शिक्षण दिले जात नाही, तर भारतीय शिक्षणात बदल करण्यासाठी गुरुकुल पद्धत उपयुक्त आहे. भारतातही गुरुकुल शिक्षण पद्धतीला प्राधान्य देण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शतकमहोत्सवनिमित्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे आयोजित शतायुषी संस्था संवाद संमेलनाच्या समारोप कार्यक्र माप्रसंगी मुकुल कानिटकर बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या शतकमहोत्सव समितीचे उपाध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर होते. यावेळी व्यासपीठावर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, कार्याध्यक्ष महेश दाबक, सेक्रे टरी ज्ञानेश्वर कुलकर्णी, सदस्य शोभना भिडे, सहसचिव प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. शिक्षणाने पैसा मिळतो असा गैरसमज पसरविला आहे, मात्र शिक्षणाने प्रतिष्ठा मिळते. परीक्षेमुळे शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. परीक्षा ही स्मरणशक्तीची घेतली जाते. याचा फायदा ठराविक विद्यार्थ्यांनाच होतो. गुरु कुल शिक्षण पद्धतीत परीक्षा घेतली जात नाही. संस्कार हे शालेय शिक्षणातून मिळत नाही. वर्गात मुले घडत नाहीत. शैक्षणिक वातावरण तयार केले गेले पाहिजे, असेही यावेळी कानिटकर म्हणाले.
सूत्रसंचालन प्रा. करु णा कुशारे तर आभार सहसचिव प्रसाद कुलकर्णी यांनी मानले. प्रास्ताविक शोभना भिडे यांनी केले. यावेळी जयंत मोंढे, संजय परांजपे, वसंत जोशी, डॉ. सारंग इंगळे, डॉ. भारद्वाज, मुंबई येथील व्यवसाय शिक्षण विभागाचे उपसंचालक वाकडे, मिलिंद कचोळे, प्रवीण बुरकुले, मधुकर जगताप यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य उपस्थित होते.
चर्चासत्रात सहभाग
डॉ. विनायक गोविलकर यांनी संस्थेने राबविलेल्या शतायुषी संस्था संवाद संमेलनाचे कौतुक केले. कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनीही मार्गदर्शन केले. तत्पूर्वी वेध भविष्याचा, स्वायत्तता काळाची गरज या विषयावरील चर्चासत्रात दिलीप टिकले, दिलीप पेठे, शरद कुंटे, महेश दाबक, श्रीरंग देशपांडे, रवींद्र वंजारवाडकर, डॉ. सुनील कुटे यांनी सहभाग घेतला.