गुरुपौर्णिमा उत्सवास प्रारंभ
By admin | Published: July 7, 2017 11:46 PM2017-07-07T23:46:50+5:302017-07-07T23:47:14+5:30
त्र्यंबकेश्वर :श्री स्वामी समर्थ गुरुपीठात श्री गुरुपौर्णिमा उत्सवास प्रारंभ झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : विठुरायाच्या जयघोषात संपूर्ण महाराष्ट्र वेडा झालेला असताना त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात एकादशीच्या मंगलदिनी सेवामार्गाच्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास प्रारंभ झाला. यानिमित्ताने विठुरायांप्रमाणेच श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरुमाऊली यांच्या चरणी हजारो सेवेकरी लीन झाले.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र दिंडोरी व समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर अंतर्गत आज देशभर हजारो समर्थ केंद्रे कार्यरत असल्याने लाखोंच्या संख्येत महिला-पुरुष सेवेकरी सक्रिय आहेत. सेवेकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता गुरुपौर्णिमा उत्सवाचे नियोजन नीटनेटके व शिस्तबद्ध व्हावे म्हणून गेल्या काही वर्षांपासून या उत्सवास आषाढी एकादशीपासूनच प्रारंभ होतो. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह कोकणातील सेवेकऱ्यांनी येऊन समर्थ महाराज व गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर दोन दिवस परराज्य व परदेशातील सेवेकरी व भाविकांसाठी राखीव ठेवण्यात आले असून, शनिवारी (दि. ८) गुरुपौर्णिमेचा मुख्य सोहळा दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसह सर्व समर्थ केंद्रांवर होणार आहे.