गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, चालवू पुढे हा वारसा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 01:36 AM2019-07-16T01:36:07+5:302019-07-16T01:37:36+5:30

आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली आहेत, अशा मुनींना वंदन करण्याचा व त्यांच्याप्रति कृतज्ञतेच्या भावनेतून पूजा करण्याचा हा मंगलमय दिवस असतो. भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये गुरु-शिष्याचे नाते दिसून येते. आधुनिक काळात तंत्रज्ञान कितीही बदलले तरी गुरुशिष्यांचे नाते आजही अढळ आहे. त्याचे पावित्र्य टिकून आहे.

 Gurus gave wisdom fat, run this legacy ..! | गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, चालवू पुढे हा वारसा..!

गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, चालवू पुढे हा वारसा..!

Next
ठळक मुद्देशिष्याने गुरुंच्या सेवेमधून मुक्ती मिळण्यासाठी प्रामाणिक असले पाहिजे.

 चारुदत्त दीक्षित

आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही, म्हणून ‘श्री’ कारानंतर अ आई... शिकविले जाते. आई ही बाळाची पहिली गुरु असते. उत्तम संस्कार करीत ती बाळाला वाढवित असते. वयाच्या पाचव्या व आठव्या वर्षी मुलाची जेव्हा मुंज केली जाते त्या उपनयन संस्कारप्रसंगी वडील मुलाला गायत्री मंत्र सांगतात. समाजात मोठ्या व्यक्तीशी बोलताना, वागताना, धार्मिक विधी कसे करावे, यश संपादन कसे करावे याबाबत उत्तम मार्गदर्शन करतात. म्हणजेच परमेश्वराला नमस्कार केल्यानंतर प्रथम आई म्हणून गुरुचे प्रथम स्थान असते, तर पिता म्हणून त्यांचे द्वितीय स्थान असते. धार्मिक-आध्यात्मिक-वैदिक, संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून गुरु-शिष्यांची परंपरा आहे आणि म्हणूनच म्हणतात की, ‘कौशल्येवीण राम न झाला.. देवकीपोटी कृष्ण जन्मला’ शिवरायांचे चरित्र घडवणारी माय जिजाबाई आईचे आपण कधीच ऋण फेडू शकत नाही.
गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हटले जाते. कारण व्यास म्हणजे विस्तार आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश. चंद्राच्या कलेकलेप्रमाणे वाढणाºया पौर्णिमेसारखा गुरुंनी दिलेले ज्ञान शिष्यांनी विस्तारित करावे, अशी अपेक्षा असते. खºया गुरुला काहीही नको असते. गुरु नि:स्वार्थी असतात. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. या उक्तीप्रमाणे ते आपल्या शिष्याला ज्ञान देत असतात आणि असे असले तरीदेखील शिष्याने गुरुंच्या सेवेमधून मुक्ती मिळण्यासाठी प्रामाणिक असले पाहिजे. गुरुंच्या शिकवणीनुसार वागायचे तर सतत स्वत:ची जाणीव ठेवणे आवश्यक असते. एक क्षण चूक झाली तरी ती लगेच गुरुंच्या लक्षात येते. रोज सूर्य उगवतो, फळे पिकतात, नद्या आपले पाणी सर्वांसाठी देतात असे असताना माणसाने निसर्गाच्या तालाप्रमाणे म्हणजेच गुरु आज्ञेप्रमाणे वागल्यास भविष्यात शिष्याला उत्तम ज्ञान वृद्धिंगत करीत उज्ज्वल यश संपादन करता येते. जप माळेचे मणी फिरविण्याच्या ज्ञानापेक्षा मदत करणारे हात अधिक पवित्र आणि श्रेष्ठ असतात.
महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मुलाधार मानले जातात. धर्मशास्र, नीतिशास्र, व्यवहार शास्र, मानसशास्र अशा अनेक विषयांसंदर्भात महर्षी व्यासांनी महाभारत पुराणातील ग्रंथात लिहून ठेवले आहे. त्यांच्या एवढे श्रेष्ठ, आदरणीय असे गुरुजी निर्माण झालेले नाही. ज्ञानदेवांनीसुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा हेतू’ असे असे म्हणून ज्ञानेश्वरी पूर्ण केली. त्यांना पुढे समाज ‘ज्ञानियांचा राजा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ओम नमोस्तुते व्यास, विशाल’ अशी प्रार्थना करून व्यास पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुंना वंदन करण्याची प्रथा आहे. नमस्कारासाठी दोन हात जोडले की आशीर्वादासाठी हजारो हात उंचावतात.
बदलत्या काळातदेखील आपल्या देशात रामायण, महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आलेली आहे. ज्या गुरुकडून आपण विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्यांच्या आशीर्वादाने त्याच बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा गुरुंना मान देणे, त्यांची आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे शिष्यांचे आद्यकर्तव्य असते. महर्षी व्यासांपासून ही परंपरा सुरू झाली असल्यामुळे ती आजमितीपर्यंत आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेतून एक कृतज्ञता वाटते.
कोणत्याही क्षेत्रात प्रत्येकाला उत्तम आणि आदर्श गुरु मिळणे भाग्याचे असते. संगीत गायन, कान, क्रीडा, विद्या या बाबतीत गुरुंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि म्हणूनच भारतीय परंपरेतील गुरु शिष्यांचे आगळे नाते जपणारे शुक्राचार्य जनक, कृष्णा-सुदामा-सांदीपनी, विश्वामित्र-राम-लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी अनेक उदाहरणे बघायला मिळतात.
संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तिनाथांनाच आपले गुरु मानले. संत नामदेव तर विठ्ठलाशी संवाद साधत असत, त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर.
सद्गुरुंची पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा होय. भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूज्यनीय मानले आहे. पौर्णिमा म्हणजे प्रकाश, गुरुशिष्याला मान देतात त्या ज्ञानाचा प्रकाश आपल्यासह इतरापर्यंत पोहचवावा यासाठी गुरुंची प्रार्थना करावयाची असते. गुरु म्हणजे ज्ञानाचा अखंड सागर आहे. जलाशयात पाणी विपुल असते. घटाघटाने घागरीत पाणी येण्यासाठी आपल्याला मान खाली झुकवावीच लागते. त्याप्रमाणे गुरुचरणी विनम्र व्हावे, त्यांचा आदर करावा. हीच अपेक्षा असते. गुरु-शिष्यांचे नाते हे काहीसे आगळेच असते. गुरु म्हणजे सापडेना वाट ज्यांना हो त्यांचा सारथी, हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, साधना जो करी तुझी जे नित्य तव सहवास दे आणि म्हणूनच म्हणतात की गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू तो पुढे हा वारसा... गुरुंच्या ज्ञानांनी, उत्तम मार्गदर्शनाने आपले मन कृतज्ञतेने जेव्हा भरून येते तेव्हा नकळत आपल्या मुखातून श्लोक म्हटला जातो.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वर:।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम:।।
(लेखक संगीतनाट्य समीक्षक, नाशिक)

 

Web Title:  Gurus gave wisdom fat, run this legacy ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.