महामार्ग पोलीस केंद्राकडून ३० लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 12:09 AM2021-11-10T00:09:18+5:302021-11-10T00:10:00+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील कसारा घाट परिसरात घाटनदेवी शिवारात संशयित गुटख्याचे पोते असल्याच्या गुप्त माहितीवरून महामार्ग घोटी टॅब पोलिसांनी बेवारस असलेले हे गुटख्याचे पोते ताब्यात घेऊन रीतसर पंचनामा केला. ताब्यात आलेल्या गुटख्याची किंमत अंदाजे ३० लाख रुपये असल्याचे समजते.

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मंगळवारी (दि.९) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०३ वरील घाटन देवी मंदिर परिसरात संशयित गुटख्याची पोती असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महामार्ग घोटी टॅबचे सहायक निरीक्षक अमोल वालझाडे व त्यांच्या पथकाने तात्काळ तेथे धाव घेतली असता त्या ठिकाणी ३३ मोठे सफेद रंगाचे पोते, त्यामध्ये एसएके असे इंग्रजी अक्षर लिहिलेली गुटख्याची पाकिटे होती व त्याचा उग्र वास येत होता.
दरम्यान, पोलिसांनी गुटख्याची पोती असलेल्या परिसरात पाहणी केली. मात्र, कुणीही संशयित आढळले नसल्याची माहिती दिली. सदरचा गुटखा हा मुंबई, ठाणे परिसरात चालणारा गुटखा आहे.
सर्वसाधारण ३० लाख रुपये किमतीचा गुटखा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे, घोटी टॅबचे सहायक निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे, शेंडे, जाधव यांनी सदरचा माल ताब्यात घेतला.