देवळ्यात ४५ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 12:27 AM2022-02-05T00:27:27+5:302022-02-05T00:27:56+5:30
देवळा : देवळा मालेगाव मार्गावर देवळा पोलीस हद्दीत ४५ लाखांचा गुटका जप्त करण्यात आला असून, संशयित वाहन चालकाला अटक करण्यात नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महा निरीक्षकांच्या पथकाला यश आले आहे.
देवळा : देवळा मालेगाव मार्गावर देवळा पोलीस हद्दीत ४५ लाखांचा गुटका जप्त करण्यात आला असून, संशयित वाहन चालकाला अटक करण्यात नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महा निरीक्षकांच्या पथकाला यश आले आहे.
हवालदार सचिन दिलीप धारणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळा ते मालेगाव महामार्गावर आयशर (क्र.एम एच १५ - ७६२३) या मालवाहू गाडीतून विमल गुटख्याने भरलेली ११३ पोती जप्त करण्यात आली असून, या गुटख्याची किंमत ४५ लाख २६ हजार ३१५ रुपये इतकी आहे.
याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकातील बापू रोहम, सचिन जाधव, बशीर तडवी, सचिन धारणकर, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मंडलिक, सुरेश टागोर आदींनी सापळा रचून पिंपळगाव (वा ) परिसरात गुटख्याची वाहतूक करणारे आयशर वाहन मुद्देमालासह जप्त केले. त्यात वरील प्रमाणे गुटका आढळून आला असून, या गुटख्याची अंदाजे किंमत ४५ लाख रुपये व वाहनांची किंमत १२ लाख व एक मोबाइल असा एकूण ५७ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत आयशरचा चालक अतुल अशोक शिंदे (रा.नाशिक ) याला अटक करण्यात आली असून, वाजदा (गुजरात ), राजू कोठावदे, सुनील अमृतकर, मॉन्टी हे चारही आरोपी मात्र फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.