इगतपुरीत गुटखा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 01:21 AM2021-10-16T01:21:58+5:302021-10-16T01:23:12+5:30
इगतपुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अवैधरीत्या व शासनबंदी असलेल्या सुगंधित पान मसाला, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला पोलिसांनी छापा टाकत रंगेहात पकडले आहे. यामध्ये १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीस पथकाने सापळा रचून जप्त केला
इगतपुरी : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अवैधरीत्या व शासनबंदी असलेल्या सुगंधित पान मसाला, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला पोलिसांनी छापा टाकत रंगेहात पकडले आहे. यामध्ये १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीस पथकाने सापळा रचून जप्त केला असून, यामध्ये गुटखा विक्री करणाऱ्या शकील हुसेन शेख या व्यापाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थ, सुगंधित सुपारी, गुटखा बंदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर व्यापाऱ्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी शहरात भाजी मार्केट परिसरात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ विक्री अवैधरीत्या करत असल्याची गुप्त माहिती इगतपुरी पोलीस ठाण्याला मिळताच इगतपुरी पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्यासह पोलीस पथकाने छापा टाकला. यात व्यापारी शकील हुसेन शेख यास बंदी असलेला गुटखा विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले. यामध्ये सुपारी, गुटखा, पान मसाला, तंबाखू, जर्दा आदी जवळपास १ लाख ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसी छाप्यात जप्त करण्यात आला.
इन्फो
शहरात छुप्या मार्गाने विक्री
शहरातील आणखी काही अवैधरित्या गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, जर्दा आदी विक्री करणारे व्यापारी व त्यांनी साठवलेला गुटख्याचा साठा मोठ्या प्रमाणात मिळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरात विविध पानटपऱ्या आणि काही दुकानदारांनी गुटख्याची विक्री चढ्या भावाने सुरू केली असून, अनेक व्यापारींनी गुप्त गोडावूनमध्ये गुटखा व जर्दा साठवून चोरी छुप्या मार्गाने दडवून ठेवल्याची चर्चा आहे. अवैधरीत्या गुटखा विक्री करणाऱ्या शकील हुसेन शेखविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय रुद्रे, राज चौधरी, संदीप शिंदे आदी करत आहे.