भगूर, कॅम्प भागातूून दारणात गटारीचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 09:59 PM2017-08-20T21:59:19+5:302017-08-21T00:27:25+5:30
भगूर नगरपालिका व देवळाली कॅम्प छावणी परिषदेच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त सांडपाणी दारणा नदीपात्रात मिसळले जात असल्याने नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
भगूर : भगूर नगरपालिका व देवळाली कॅम्प छावणी परिषदेच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त सांडपाणी दारणा नदीपात्रात मिसळले जात असल्याने नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
भगूरमधील नरशा ओहळ, राम मंदिररोड, राजवाडा, देवळाली कॅम्प छावणी परिषद हद्दीतील सैनिक सोसायटी, अमित श्रीमंत रो-हाउस, शहा सोसायटी, पंचदीप सोसायटी, एमईएस सोसायटी, विजयनगर, दोनवाडेरोड आदी ठिकाणच्या नाले, गटारी यातून दुर्गंधीयुक्त घाण पाणी दारणा नदीपात्रात जाऊन मिसळत आहे. याकडे भगूर नगरपालिका व छावणी परिषदेकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे नदीपात्रातील मासे व इतर जलचर प्राण्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. नदीपात्रातून जलशुद्धीकरण केंद्रात येणारे पाणी हे योग्य पद्धतीने शुद्धीकरण केले जात नसल्याने पाण्याला उग्र वास येत आहे. यामुळे संसर्गजन्य रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. दारणा नदीपात्रात भगूर व देवळाली कॅम्प भागातून मोठ्या प्रमाणात गटारी, नाल्याचे सांडपाणी मिसळत असल्याने नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. याकडे प्रदूषण नियामक मंडळाने गांभीर्याने लक्ष देऊन नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी कठोर कारवाई करून उपाययोजनेच्या सूचना कराव्या, अशी मागणी केली जात आहे.