जाफरनगरजवळील रस्त्यावर गटारीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:12 AM2021-01-18T04:12:53+5:302021-01-18T04:12:53+5:30

मालेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निकालाची उत्सुकता मालेगाव: तालुक्यात दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेले मतदान यंत्रात बंद झाले असून उद्या ...

Gutter water on the road near Jafarnagar | जाफरनगरजवळील रस्त्यावर गटारीचे पाणी

जाफरनगरजवळील रस्त्यावर गटारीचे पाणी

Next

मालेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निकालाची उत्सुकता

मालेगाव: तालुक्यात दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेले मतदान यंत्रात बंद झाले असून उद्या सोमवारी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे. मतपेटीत ज्यांचे भवितव्य बंद झाले आहे अशा उमेदवारांची धाकधूक होत असून उद्या सकाळपासूनच जाहीर होणाऱ्या निकालानंतर त्याचे नशीब फुलणार आहे. दरम्यान, गावागावातील तरुणांमध्ये उद्या कुणाचे पॅनल सत्तेवर येते याबाबत कट्ट्यावर चर्चा सुरू झाली आहे.

माळमाथा भागात रब्बी पिके जोमात

मालेगाव: तालुक्यात माळमाथा भागात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होते; परंतु आता या भागातील शेतकरी कापसाबरोबरच रब्बी हंगामात बाजरी, ज्वारीसारखी पिके घेत असून ही पिके जोमात आली आहेत. तर काही शेतकरी कांदा लागवडीच्या कामात व्यस्त आहेत. ग्रामपंचायत निवडणुका संपल्या असल्याने शेतकरी आपल्या शेती कामात व्यस्त झाला आहे. पिकांवर दाणे टिपणाऱ्या पक्ष्यांना हुसकावण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत.

गिरणा बंधाऱ्यातील उन्हाळ्यातही पाणी

मालेगाव: यंदा तालुक्यात पाऊस चांगला झाल्याने हरणबारी धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे तालुक्यातील तळवाडे साठवण तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा झाला आहे. उन्हाळ्यात नेहमी कोरड्या पडणाऱ्या नद्या आणि नाले यंदा अजूनही काही भागात वाहत आहेत तर जनावरांच्या चाऱ्याची समस्या अद्याप जाणवलेली नाही. शहरातील गिरणा बंधाऱ्यात अद्याप जलसाठा असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

विवाहितेस विकल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्द गुन्हा

मालेगाव: श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील दोन महिलांनी मालेगावच्या विवाहितेस इंदोर येथे विकल्याप्रकरणी श्रीरामपूरच्या शहर पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोतीनगर भागातील विवाहितेच्या पतीने फिर्याद दिली. पाेलिसांनी अनिता रवींद्र कदम (रा. आंबेडकर वसाहत दत्तनगर श्रीरामपूर) व तिची मैत्रीण संगीता (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी इंदोर येथे अज्ञात व्यक्तीकडून १ लाख २० हजार रुपये घेऊन विवाहितेला त्याच्या ताब्यात दिले. दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा धायवट करीत आहेत.

मालेगाव तालुक्यात बर्ड फ्लूची भीती

मालेगाव: तालुक्यातील शेतकऱ्यांसह पोल्ट्री व्यावसायिकांत बर्ड फ्ल्यूविषयी भीतीचे वातावरण असून शेतकरी आणि पोेल्ट्री व्यावसायिक मिळेल त्या भावात कोंबड्या विकून टाकत आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूची एकही घटना घडली नसल्याने शेतकऱ्यांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

मालेगाव तालुक्यात कोरोनाचे १५८ रुग्ण

मालेगाव: शहरासह तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचे लसीकरण करण्यात आले असले तरी तालुक्यातून अजून कोरोना हद्दपार झालेला नाही. मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे १६ तर शहरात १४२ बाधित उपचार घेत आहेत. महापालिका आणि पोलिसांनी नागरिकांना मास्क वापरणे अनिवार्य केले असले तरी शहरात मात्र नागरिक कोणताही मास्क वापरताना दिसत नाहीत. यासाठी मनपा आणि पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्याविरोधात दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

थंडी गायब; उकाडा वाढू लागला

मालेगाव: शहरासह परिसरातून गुलाबी थंडी गायब झाली असून संक्रांतीनंतरच ऊन वाढू लागले आहे. त्यामुळे सकाळी काहीसे थंड असणारे वातावरण दुपारनंतर मात्र चांगलेच तापू लागले आहे. गेले चार महिने बंद असणारे पंखे आता रात्री उकाडा वाढू लागल्याने शहरासह तालुक्यातील नागरिकांना सुरू करावे लागत आहेत. काही भागात आतापासूनच रस्त्यांवर गर्दी कमी दिसत आहे.

एसटी पिकअप शेडची मागणी

मालेगाव: मोसमपूल चौकात सिग्नल बसविण्यात आले असून यामुळे सटाणा आणि नाशिककडून येणाऱ्या वाहनांची कोंडी होत आहे. प्रवाशांना एसटीतून लोढा मार्केटच्या आधीच उतरावे लागत आहेत तर नाशिक आणि मनमाडकडून येणाऱ्या प्रवाशांना महात्मा फुले पुतळ्याच्या अलीकडेच उतरावे लागत आहे. आता उन्हाळा सुरू झाल्याने बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशांसाठी महापालिकेने सटाणा रोडवर आणि नाशिक रस्त्यावर पिकअप शेड उभारावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

दोन दिवस लसीकरण बंद

मालेगाव: शहरात महापालिका आरोग्य विभागातर्फे कारोना लसीकरण सुरू असून ॲपला आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे रविवारी आणि उद्या सोमवारी कोरोना लसीकरण करण्यात येणार नाही. महापालिकेतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण केले जात आहे. काल झालेल्या लसीकरण मोहिमेत काही आरोग्य केंद्रात मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा डोस घेतला मात्र काही कर्मचाऱ्यांनी घेतला नाही.

Web Title: Gutter water on the road near Jafarnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.