नळांमधून चक्क गटारीचे पाणी
By admin | Published: May 8, 2017 04:49 PM2017-05-08T16:49:11+5:302017-05-08T16:49:11+5:30
वडाळागाव परिसरातील तैबानगर भागात पंधरवड्यापासून गटारीचे सांडपाणी मिश्रीत पाणी नळांना
नळांमधून चक्क गटारीचे पाणी
नाशिक / आॅनलाइन लोकमत
नाशिक येथील वडाळागाव परिसरातील तैबानगर भागात पंधरवड्यापासून गटारीचे सांडपाणी मिश्रीत पाणी नळांना येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तैबा नगर, हाजी नवाब सोसायटी आदि भागांमधील ड्रेनेज तुडूंब भरले आहे. तसेच नळांनादेखील दूषित गटारीच्या पाण्याप्रमाणे पाणी येत असल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करून देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत दखल घेतली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.दूषित पाण्यामुळे महिला व मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
महिनाभरापासून वडाळागावात पाणीपुरवठ्याचे तीनतेरा झाले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अद्याप पाणीपुरवठा सुरळीत करण्यास यश येत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महिनाभरापासून वडाळागावातील माळी गल्ली, रझा चौक, मनपा शाळेजवळचा परिसर, कोळीवाडा, रामोशीवाडा आदि भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महेबुबनगर, साठेनगरमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तैबानगर, हाजी नवाब सोसायटी या भागांमध्ये सुमारे ५० पेक्षा अधिक कुटुंबांच्या नळांना गटारीच्या सांडपाण्यासारखे काळेकुट्ट पाणी येत असल्याची तक्रार या भागातील महिलांनी केली आहे.